नवी दिल्ली : सायरस मिस्त्री यांना टाटा स्टीलच्या चेअरमनपदावरून हटविण्याच्या हालचाली टाटांनी सुरू केल्या आहेत. टाटा स्टीलच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून असलेले नसली एन. वाडिया यांनाही हटविण्यात येणार आहे. दोघांना काढण्यासाठी टाटा स्टीलच्या भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याचे निर्देश टाटा सन्सने टाटा स्टीलच्या संचालक मंडळास दिले आहेत. टाटा सन्स ही कंपनी टाटा स्टीलची प्रवर्तक आणि मुख्य भागधारक आहे. या अधिकारात कंपनीने सभा बोलावण्याचे निर्देश दिले आहेत. टाटा स्टीलने नियामकीय दस्तावेजांत ही माहिती दिली. कंपनीने म्हटले की, सी. पी. मिस्त्री आणि नसली एम. वाडिया यांना कंपनी कायदा २0१३ च्या कलम १६९ अन्वये संचालक पदावरून हाकलण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेसमोर ठराव मांडा, असे निर्देश आपणास टाटा सन्सने दिले आहेत. या प्रस्तावासाठी टाटा सन्सने याच कायद्याच्या कलम ११५ अन्वये विशेष नोटीसही जारी केली आहे.
मिस्त्री, वाडिया यांनाही काढणार
By admin | Published: November 12, 2016 2:43 AM