ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - ' मोदी सरकार आम्हाला जाणीवपूर्वक लक्ष्य करत असून त्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे' असा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला. नॅशनल हेराल्ड प्रकरणी पतियाळा हाऊस कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
' आज मी एखाद्या सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे न्यायालयात साफ मनाने हजर राहिले. सरकार आम्हाला जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहे, यापूर्वीही राजकीय विरोधकांनी आम्हाला लक्ष्य केले आहे. मात्र आम्ही कायम त्यांच्याविरुद्ध लढा देत आलो आहोत आणि यापुढेही लढत राहू,' असा निर्धार सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. तसेच 'सत्य काय आहे ते एक दिवस नक्की समोर येईल', असेही त्या म्हणाल्या.
खोटे आरोप करून पंतप्रधानांचा विरोधकांना झुकवण्याचा प्रयत्न - राहुल गांधी
सोनिया गांधी यांच्याप्रमाणेच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर कडाडून टीका केली. ' पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्यावर नेहमी खोटे आरोप केले, पण आम्ही झुकणार नाही, एकही पाऊल मागे हटणार नाही' असे राहुल म्हणाले. माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास असून आम्ही कायम लढा देत राहू. आम्ही नेहमीच देशातील गरिबांच्या भल्यासाठी काम केलं आहे आणि यापुढेही करत राहू. गरिबांसाठी काम करण्यापासून मला व काँग्रेस पक्षाला कोणीही रोखू शकणार नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान पतियाळा हाऊस कोर्टाने शनिवारी दुपारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहूल गांधी यांना प्रचंड दिलासा देत त्यांच्यासह मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस व सुमन दुबे यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी जामीन मंजूर केला. वैयक्तिक ५० हजार रुपयांचा जातमुचलका आणि एक हमीदार द्यायला सांगत कोर्टाने जामीन मंजूर केला. सोनिया गांधींसाठी ए. के. अँटनी यांनी तर राहूल गांधींसाठी प्रियंका गांधींनी हमीपत्र दिले आहे.