ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. ६ - एकापेक्षा जास्त लग्न करण्याची प्रथा जिवंत ठेवण्यासाठी मुस्लीम पुरुष कुराणाचा गैरवापर करत आहे असे मत गुजरात हायकोर्टाने मांडले आहे. अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज आहे असे कोर्टाने म्हटले आहे
गुजरातमध्ये राहणा-या जफर अब्बास यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने आयपीसीतील कलम ४९४ अंतर्गत तक्रार दाखल केली होती. जफर यांनी माझ्या सहमतीशिवाय दुसरे लग्न केल्याचे त्यांच्या पत्नीचे म्हणणे होते. आयपीसीतील कलम ४९४ मध्ये एकापेक्षा जास्त पत्नी ठेवणे हा गुन्हा आहे. तर जफर यांनी स्वतःच्या बचावासाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचा दाखला दिला होता. मुस्लीम धर्मात एक पुरुष चार पत्नी ठेऊ शकतो असे जफर यांनी म्हटले होते. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाचे न्या. जे बी परदीवाला यांनी जफर यांच्या बाजूने कौल दिला पण यावर काही महत्त्वाचे मुद्देही मांडले.
कुराणात एका पेक्षा अधिक विवाहांना मान्यता दिली त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. पण आता मुस्लीम पुरुष स्वार्थापायी एका पेक्षा जास्त लग्न करतात असे खडे बोल न्यायालयाने सुनावले आहेत. मुस्लीम पर्सनल लॉनुसार एकापेक्षा जास्त लग्न करताना पत्नीचा छळ करण्याचे अधिकार देत नाही. एका लग्नातून बाहेर पडल्यावरच दुसरे लग्न होते. पण अशा प्रकरणांवर तोडगा काढण्यासाठी देशात कोणताही कायदा नाही असे हायकोर्टाने स्पष्ट केले.