नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरु लागली आहे. एप्रिलमध्ये देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली. गेले अनेक दिवस देशात दररोज ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती दिली जात आहे. भारतात सर्वाधिक वापर कोविशील्डचा होत आहे. आता कोविशील्ड लसीबद्दल एक पॉझिटिव्ह माहिती समोर आली आहे.
कोविशील्डची लस जगभरात ऍस्ट्राझेनेका नावानं उपलब्ध आहे. सध्या जगभरात मिक्स लसीचा प्रयोग केला जात आहे. त्यात ऍस्ट्राझेनेका लसीचाही वापर होत आहे. दक्षिण कोरियात करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, ऍस्ट्राझेनेका लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस फायझरच्या लसीचा घेतल्यास खूप मोठा फायदा होतो. या मिक्स लसीकरणामुळे सहापट अधिक अँटिबॉडीज तयार होतात, असं संशोधन सांगतं.
मिक्स लसीकरण आणि सर्वसामान्य लसीकरणाच्या प्रयोगात ४९९ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यापैकी १०० जणांना आधी ऍस्ट्राझेनेका आणि मग फायझरचा डोस देण्यात आला. २०० जणांना दोन्ही डोस फायझरचे देण्यात आले. तर उर्वरित कर्मचाऱ्यांना दिले गेलेले दोन्ही डोस ऍस्ट्राझेनेकाचे होते. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
संशोधनात सहभागी झालेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या शरीरात कोरोना विषाणू रोखणाऱ्या अँटिबॉडीज तयार झाल्या. फायझरचे दोन डोस घेतलेल्या आणि एक डोस ऍस्ट्राझेनेकाचा आणि दुसरा डोस फायझरचा घेतलेल्या व्यक्तींमधील अँटिबॉडीजचं प्रमाण सारखं होतं. मात्र दोन्ही डोस ऍस्ट्राझेनेका लसीचे घेतलेल्यांपेक्षा एक डोस ऍस्ट्राझेनेकाचा आणि दुसरा डोस फायझरचा घेतलेल्यांच्या अँटिबॉडीज सहा पटीनं अधिक होत्या.