आईजोल - देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी ४ राज्यांचे निकाल रविवारी जाहीर झाल्यानंतर आज मिझोरममधील निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून पोस्टल मतदानाचे निकाल समोर आले आहेत. त्यानंतर, आता ईव्हीएम मतमोजणीलाही सुरुवात झाली आहे. येथील राज्यात स्थानिक पक्षांचं वर्चस्व निकालात जाणवत असून काँग्रेसला अपेक्षित यश मिळत नाही. तर, भाजपही विजयाच्या स्पर्धेत नाही. पहिल्या कलानुसार झोराम पीपल्स मूव्हमेंटने आघाडी घेतली असून जागांवर त्यांचे उमेदवार विजयाच्या मार्गावर आहेत. तर, मिझो नॅशनल फ्रंटसोबत त्यांची अटीतटीची लढाई दिसून येते.
मिझोरममध्ये ७ नोव्हेंबर रोजी सुमारे ७७,०४ % मतदान झाले होते. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF), झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. भाजप येथे किंगमेकर बनण्याचा प्रयत्न करत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार झोराम पीपल्स मूव्हमेंटने २१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर, मिझो नॅशनल फ्रंट ११ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेसच्या ३ उमेदवारांनी आघाडी घेतली असून भाजपा चौथ्या स्थानावर जावे लागले. भाजपचे उमेदवार १ जागेवर आघाडीवर आहेत.
मुख्यमंत्री झोरांगथामा यांच्या नेतृत्त्वात एमएनएफने यंदाची निवडणूक लढवली आहे. तर, झेडपीएम माजी आयपीएस लालदुहोमा यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. ते झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) चे प्रमुख आहेत. लालदुहोमा हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुरक्षा प्रमुखही राहिले आहेत. सन १९८४ मध्येच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि खासदारही झाले. मात्र, वादानंतर त्यांनी काँग्रेस सोडली. सलग २ टर्म सत्तेत राहिल्यानंतर काँग्रेसला २०१८ साली मिझोरममधील सत्ता गमवावी लागली होती. ईशान्य भारतातील काँग्रेसचा हा शेवटचा गड २०१८ साली हातून गेला. पण, यंदाच्या निवडणुकीत तोच गड परत मिळवण्यासाठी काँग्रेसने धडपड केली. तर, मणीपूर अशांततेवरुन लक्ष्य ठरलेल्या भाजपाने तिकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मिझोरममध्ये प्रचारासाठी जाण्याचे टाळले.
२०१८ मध्ये कोणी किती जागा जिंकल्या
दरम्यान, गत निवडणुकीत काँगेसला ४० पैकी ५ जागा जिंकता आल्या. मिझो नॅशनल फ्रंटने स्पष्ट २६ जागांसह बहुमत मिळवलं होतं. तर, झोराम पिपल्स मूव्हमेंटला ८ जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजपनेही १ जागा जिंकली होती.