देशातील ४ पैकी तीन राज्यात भाजपने सत्ता काबिज केल्यानंतर उर्वरीत मिझोरमच्या निकालाकडे आज सर्वांचे लक्ष लागले होते. सकाळी ८ वाजल्यापासून पोस्टल मतदानाचे निकाल समोर आले. त्यानंतर, आता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दोन तासांतच येथील जनतेचा कौल समोर आला. राज्यात स्थानिक पक्षांचं वर्चस्व निकालात स्पष्ट होत असून झोराम पीपल्स मूव्हमेंटने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. झेडपीएमचे प्रमुख लालदुहोमा यांच्या पक्षाने २० जागांवर विजय मिळवला असून ७ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. म्हणजेच, त्यांनी ४० पैकी आवश्यक बहुमताचा आकडा गाठला आहे.
मिझोरममध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळाला नसून गतवर्षीच्या तुलनेत यंदा काँग्रेसच्या जागा घटल्या आहेत. केवळ एका जागेवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहे. तुलनेत भाजपचे २ उमेदवार निवडून आले आहेत. येथील सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. एमएनएफने केवळ ७ जागा जिंकल्या असून ३ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे, येथे लालदुहोमा यांच्या झोराम पीपल्स मूव्हमेंटचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे.
मिझोरममध्ये मतमोजणी सुरू असतानापासूनच, ७४ वर्षीय माजी आयपीएस अधिकारी लालदुहोमा आणि त्यांचा पक्ष, झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) यांच्यावर साऱ्यांचे लक्ष होते. एक्झिट पोलने मिझोराममध्ये ZPM ला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला होता. तोच अंदाज खरा होताना दिसत आहे. येथे, ZPM ने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे आणि MNF पक्षाचे अनेक दिग्गज निवडणुकीत पराभूत झाले आहेत. मिझोरमचे भावी मुख्यमंत्री म्हणून सध्या एका नावाची चर्चा आहे. ते नाव म्हणजे लालदुहोमा.
मिझोरममधील विजयानंतर लालदुहोमा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आता, आगामी सरकारपुढे असलेल्या आव्हांनाची गोष्ट सांगितली. गत सरकारने केलेल्या आर्थिक कर्जातून पुढे येत राज्याच्या विकासासाठी काम करायचं आहे. राज्यपालांची भेट घेऊन मी उद्या किंवा परवा शपथविधी सोहळ्याबाबत विचारणा करणार आहे, असेही लालदुहोमा यांनी म्हटलं.
कोण आहेत लालदुहोमा?
माजी आयपीएस अधिकारी असलेले लालदुहोमा यांचा राजकारणातील प्रवास विलक्षण आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ते निकटवर्तीय मानले जात. गोवा केडरच्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असलेले लालदुहोमा नंतर केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आले होते. त्यापुढे राष्ट्रीय राजधानीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षेचे ते प्रभारीही बनले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ZPMची स्थापना केली. 1984 मध्ये लोकसभेत त्यांनी प्रवेश केला. पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरलेले संसदेचे ते पहिले सदस्य बनले तेव्हा त्यांना महत्त्वपूर्ण आव्हानाचा सामना करावा लागला. २०२० मध्ये लालदुहोमा यांना पक्षांतर विरोधी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे विधानसभेचे सदस्य म्हणून अपात्रत ठरवले गेले. पण २०२१ मध्ये सेरछिप जागेसाठी पोटनिवडणूक जिंकून त्यांनी दमदार पुनरागमन केले. आज त्यांचा हाच पक्ष, त्यांच्या नेतृत्त्वात मिझोरममध्ये सत्तेत आला आहे.