नवी दिल्ली - आपल्या निस्वार्थी आणि प्रेमळ कृतीमुळे एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन ठरलेल्या मिझोरममधील त्या चिमुकल्यास पेटाकडून सन्मानित करण्यात आले आहे. पेटा ही प्राण्यांसाठी आणि संरक्षणासाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. कोंबडीच्या पिल्लाचा जीव वाचविण्यासाठी हातात 10 रुपये घेऊन डॉक्टरांकडे धावणाऱ्या चिमुकल्यास पेटाच्या भारतीय संस्थेने सन्मानित केले आहे. 'कॉमपॅशिएनेट कीड' प्रवर्गातून 6 वर्षीय दरेक सी लालच्छन्हिमाचा सन्मान पेटाने केला आहे. तसेच, या पुरस्कारामुळे अनेक चिमुकल्यांना प्रेरणा मिळेल, असेही पेटाने म्हटले आहे.
...अन् कोंबडीच्या पिलाला वाचवण्यासाठी तो चिमुकला हॉस्पिटलमध्ये पोहोचला!
लहान मुले ही देवा घरची फुले कशी असतात याचा प्रत्यय अनेकदा येतच असतो. लहान मुलंच ही या ग्रहावर सर्वात निरागस, पवित्र आणि स्वच्छ मनाची असतात. त्यांच्या विचारांमध्ये कोणताही गढूळपणा नसतो, ते फारच सोपा आणि सरळ विचार करतात. असंच काहीसं मिझोरामच्या चिमुकल्याबाबत पाहायला मिळालं होतं. झालं असं की, खेळत असताना चुकून या चिमुकल्याची सायकल, शेजारीच असलेल्या कोंबडीच्या पिल्लावरून गेली. पण, तो तिथून पळून गेला नाही. त्याने त्याच्याकडे असलेले जेवढे पैसे होते ते सोबत घेतले, कोंबडीचं पिल्लू सोबत घेतलं आणि तो जवळच्या हॉस्पिटलमध्ये मदतीसाठी पोहोचला. एका यूजरने हा फोटो फेसबुकवर शेअर करताच मोठ्या संख्येने या फोटोला शेअर करण्यात आले. त्यावेळी, जवळपास 50 हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये मुलाच्या चेहऱ्यावर चिंतेचे हावभाव स्पष्टपणे दिसत होते. तर, त्याचा तो केविलवाणा चेहरा पाहून अनेकांनी सोशल मीडियावरुन हळहळ व्यक्त करत त्याचे कौतुकही केले.
आपल्या निस्वार्थी आणि निरागस कृतीमुळे सोशल मीडियावर या चिमुकल्याने कोट्यवधींची मने जिंकली होती. तसेच, सोशल मीडियाने या चिमुकल्याचे कौतुकही केले होते. त्यानंतर, त्याच्या शाळेकडूनही त्याचा सत्कार करण्यात आला होता. आता, पेटा या संस्थने चिमुकल्याच्या त्या धडपडीची आणि धावपळीची दखल घेतली आहे. या लहान मुलाने आपल्या कृतीतून मोठा संदेश दिला आहे. पशू-प्राण्यांप्रती असलेली सहानुभूती आणि प्राण्यांबद्दलचे, एका मुक्या जीवाबद्दलचे प्रेम त्याने आपल्या कृतीतून व्यक्त केले आहे. त्यामुळे त्याचा सन्मान अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे पेटाने म्हटले आहे. पेटाने सन्मान केल्यानंतर दरेकला सेलिब्रिटी म्हटलं जातंय. पण, दरेक म्हणतो आई सेलिब्रिटी म्हणजे काय गं ?