काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (१६ सप्टेंबर) मणिपूर हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदींना इस्रायलची जास्त काळजी आहे, असे सांगत भाजप केवळ द्वेष पसरवण्याचे काम करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, मिझोरामधील निवडणुकीसाठी राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी येथील आयझॉलमधील राजभवनाजवळील एक सभेला संबोधित केले.
यावेळी, मणिपूर आता एक राज्य राहिले नाही, तर जातीच्या आधारावर दोन राज्यांमध्ये विभागले आहे. १९८६ मध्ये शांतता करारावर स्वाक्षरी करून बंडखोरीग्रस्त ईशान्येकडील राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला होता, असे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारला इस्रायलमध्ये काय घडत आहे? याबद्दल अधिक स्वारस्य आहे, परंतु मणिपूरमध्ये काय घडत आहे, याची त्यांना चिंता नाही, हे आश्चर्यकारक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
मणिपूरमध्ये लोक मारले जात आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच, एकमेकांचा आदर करणे, सहिष्णुता बाळगणे, एकमेकांच्या धर्म आणि भाषेतून शिकणे ही भारताची विचारधारा आहे, मात्र भाजप त्यावर हल्ला करत आहे. भाजप द्वेष आणि हिंसाचार पसरवत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तर, मे महिन्याच्या सुरुवातीला मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाला होता.
हमास-इस्रायल यांच्यातील युद्धाचा आज दहावा दिवसदरम्यान, ७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा आज दहावा दिवस आहे. हमासच्या ठिकाणांवर इस्रायलचे हवाई हल्ले सुरूच आहेत. त्याचवेळी गाझा पट्टीतून हमास आणि लेबनानमधून हिजबुल्लाह इस्त्रायलवर सातत्याने रॉकेट डागत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत २७९९ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ७२४ हून अधिक मुलं आणि ३७० हून अधिक महिलांचा समावेश आहे. तर १० हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.