ऐझॉल - देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी होत असतानाच मिझोरमच्या एका मंत्र्याने अधिक मुल जन्माला घालणाऱ्यांना 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. मिझोरमचे क्रीडा, युवा आणि पर्यटन मंत्री रॉबर्ट रोमाविया रॉयटे यांनी लोकसंख्येच्या दृष्टीने छोट्या मिझो समुदायातील लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक आपत्य असलेल्या आई-वडिलांना 1 लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
54 वर्षीय रॉयटे यांना तीन मुली आणि एक मुलग आहे. त्यांनी फादर्स डेच्या (रविवार) दिवशी ही घोषणा केली. मात्र, त्यांनी हे बक्षीस मिळविण्यासाठी किमान अथवा कमाल मुलांची संख्या किती असावी, हे सांगितलेले नाही. बक्षीसाची ही रक्कम एनईसीएस (नॉर्थ ईस्ट कंसल्टन्सी सर्व्हिसेस)च्या माध्यमाने प्रायोजित केले जाईल. मिझोरमची लोकसंख्या केवळ 52 व्यक्ती प्रति वर्ग किमी एवढी आहे. तर राष्ट्रीय सरासरी 382 व्यक्ती प्रति वर्ग किमी आहे.
जगातील सर्वात मोठ्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; ३८ पत्नी, ८९ मुलं असलेल्या व्यक्तीचं निधन
एनईसीएस एक खासगी संघटना आहे. ही एक मुख्य फुटबॉल क्लब ऐझॉल फुटबॉल क्लब (एएफसी)ची आधिकृत प्रायोजकही आहे. रॉयटे हे या भागातील खेळ आयोजनांचे एक प्रमुख आयोजक आणि एएफसीचे मालकही आहेत. ते म्हणाले यासाठी ज्या व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल, त्याला प्रमाण पत्र आणि एक ट्रॉफीही दिली जाईल.
वंध्यत्व दर आणि मिझोरममधील घटता लोकसंख्या वृद्धी दर अनेक वर्षांपासून एक गंभीर समस्या आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटमध्ये सामील झालेले रॉयटे म्हणाले, की 'कमी लोकसंख्या एक गंभीर प्रश्न आहे. तसेच, छोट्या समुदायांच्या प्रगतीसाठीही एक मोठा अडथळा आहे.' मिझोरमची लोकसंख्या केवळ 11 लाख (2011च्या जनगणनेनुसार) एवढी आहे. ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे.