ईशान्येकडील राज्य मिझोराममध्ये बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथील सायरांगजवळ एक बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळला. या दुर्घटनेत जवळपास १७ मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. दरम्यान, घटनास्थळी रेल्वे प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेत पुलासाठी बांधण्यात येणाऱ्या पिलरखाली ३० ते ४० जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, या घटनेत मृतांचा आकडा सुद्धा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. टनास्थळी रेल्वे प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
दरम्यान, रिपोर्टनुसार, कोसळलेल्या पुलाच्या पिलरची उंची जवळपास १०४ मीटर म्हणजेच कुतुबमिनारच्या उंचीपेक्षा ४२ मीटर जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. हा बांधकामाधीन पूल मिझोरामची राजधानी ऐझॉलपासून २० किलोमीटर अंतरावर आहे. ईशान्य फ्रंटियर रेल्वेचे सीपीआरओ सब्यसाची डे यांनी सांगितले की, दुर्घटनेनंतर संबंधित अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिझोरमचे मुख्यमंत्री झोराम थांगा यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करून सांगितले आहे की, ऐझॉलजवळील सायरंग येथे बांधकामाधीन ओव्हर ब्रिज कोसळला असून, त्यात १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.