मिझोरममध्ये ‘झेडपीएम’चे आव्हान अन् दारूबंदी शिथिलतेचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 04:22 AM2018-12-12T04:22:21+5:302018-12-12T04:23:28+5:30
सत्ताविरोधी वातारवरणाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसला जेवढ्या मोठ्या पराभवाची अपेक्षा नव्हती त्यापेक्षा जास्त फरकाने मिझोराममध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.
- असिफ कुरणे
सत्ताविरोधी वातारवरणाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसला जेवढ्या मोठ्या पराभवाची अपेक्षा नव्हती त्यापेक्षा जास्त फरकाने मिझोराममध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. काँग्रेसलामिझो नॅशनल फ्रंटसोबत झोराम पीपल्स मुव्हमेंट (झेडपीएम) आघाडीने तगडे आव्हान दिले. जवळपास २०पेक्षा जास्त मतदारसंघांत एमएनएफ विरुद्ध झेडपीएम यांच्यात मुख्य लढत झाली. काँग्रेस तिसऱ्या स्थानावर राहिली.
सलग दोन टर्म मुख्यमंत्री पदावर असलेल्या लालथनहवला यांच्याविरोधात लोकांमध्ये असंतोष होता. दारूबंदी शिथिल करण्याचा निर्णय, शवपेट्यांचे वाढलेले भाव, पेट्रोलच्या किमती या मुद्द्यांबरोबर मिझो नॅशनल फ्रंटने दशकापेक्षा जास्त काळापासून अडगळीत पडलेल्या मिझो राजकारणाला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हवा दिली होती. त्यांचा त्यांना फायदा होत असल्याचे दिसते.
ख्रिश्चनबहुल मतदार असलेल्या राज्यात चर्च आणि ख्रिश्चन मिशनरी, नागरी संघटनांचे प्रभुत्व असलेल्या ठिकाणी त्यांचा विरोध डावलत काँग्रेसने अनेक वर्षांपासून सुरू असलेली दारूबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय काँग्रेसच्या अंगलट आल्याचे निकालातून दिसते. येथील पराभवाने ईशान्येकडील काँग्रेसचा शेवटचा बालेकिल्ला देखील ढासळला आहे. हिंदी भाषिक राज्यात काँग्रेसने भाजपला चांगली टक्कर देत यश मिळवले असले तरी पारंपरिक बालेकिल्ल्यात मात्र पराभव पत्करावा लागला.
निकालाची कारणे...
झेडपीएम आघाडीने अनपेक्षितरीत्या राजधानी ऐझॉलमध्ये मारलेली मुसंडी अनेकांना धक्का देणारी ठरली.
ब्रू समाजाच्या मतदानाविरोधात काँग्रेसने भूमिका घेत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
कमी मतदार असलेल्या मतदारसंघात चौरंगी लढतीचा फटका काँग्रेसला बसला.