- शीलेश शर्मानवी दिल्ली : परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांचा समाधानकारक खुलासा करावा किंवा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने बुधवारी केली.ज्येष्ठ काँग्रेस नेते जयपाल रेड्डी पत्रकार परिषदेत म्हणाले की, अकबर यांच्या मौनाने त्यांच्यावरील संशयाचे निराकरण होणार नाही. त्यामुळे समाधानकारक खुलासा करता येत नसेल, तर त्यांनी लगेच पद सोडावे.आरोप करणाऱ्या महिला अकबर यांच्यासोबत पूर्वी काम केलेल्या जबाबदार पत्रकार असल्याने याप्रकरणी चौकशी केली जावी, अशीही त्यांनी मागणी केली. संशयाचे ढग असताना अकबर मंत्रीपदावर कसे राहू शकतात, असाही त्यांचा सवाल होता. याप्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही मूग गिळून गप्प बसावे, यावरही टीका करताना रेड्डी यांनी आरोप केला की, आपल्या कनिष्ठ सहकाºयास पाठीशी घालून स्वराज जबाबदारी झटकत आहेत.विविध क्षेत्रांतील महिलांनी त्यांच्या वरिष्ठांकडून पूर्वी झालेल्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडण्याची ‘मी टू’ मोहीम सुरू झाली आहे.अकबर पूर्वी विविध वृत्तपत्रांचे संपादक असताना त्यांनी आपल्याशी लैंगिक गैरवर्तन केल्याचे आरोप किमान सहा महिला पत्रकारांनी समाजमाध्यमांतून केले आहेत. या मोहिमेत असे आरोप झालेले अकबर हे पहिलेच राजकीय नेते आहेत.
एम.जे. अकबर यांनी खुलासा करावा किंवा पद सोडावे - काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 5:45 AM