चेन्नई - एम. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांची आज द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमकेच्या अध्यक्षपदी औपचारिक निवड झाली आहे. डीएमकेच्या चेन्नईतील मुख्यालयात आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून स्टॅलिन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. करुणानिधी यांच्या निधनानंतर डीएमके पक्षावरील वर्चस्वावरून त्यांच्या कुटुंबीयांमध्ये स्पर्धा सुरू झाली होती. मात्र अखेरीस स्टॅलिन हेच करुणानिधींचे राजकीय उत्तराधिकारी बनण्यात यशस्वी ठरले. तर दुरुईमुरुगन यांची पक्षाच्या मुख्य सचिवपदी निवड करण्यात आली.
एम.के. स्टॅलिन हे दीर्घकाळापासून करुणानिधींसोबत पक्षाचे कामकाज पाहत होते. स्टॅलिन यांनी चेन्नईचे महापौरपद आणि तामिळनाडूचे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांची डीएमकेचे कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. सुमारे सहा दशकांपासून तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवणारे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे सात ऑगस्ट रोजी निधन झाले होते. त्यांनी दीर्घकाळापर्यंत डीएमके पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांची अध्यक्षपदी निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. दरम्यान स्टॅलिन यांनी रविवारी अध्यक्षपदासाठी औपचारिक नामांकन दाखल केले होते. नामांकन दाखल करण्यापूर्वी त्यांनी स्टॅलिन, दुरईमुरुगन आणि पक्षातील ज्येष्ठ नेते टी. आर. बालू, ए. राजा यांनी करुणानिधींची पत्नी दयालू अम्माल यांची निवास्थानी भेट घेऊन चर्चा केली होती.