चेन्नई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. यातच तामिळनाडूमधील द्रविड मुनेत्रा काझगम (डीएमके) पक्षाचे प्रमुख एमके स्टॅलिन यांनी आयकर विभागाला खुले आव्हान देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आयकर विभागाने नरेंद्र मोदी यांच्या घरी छापे टाकावेत, असे एमके स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
कोयंबतूरमधील एका प्रचारसभेत लोकांना संबोधित करताना एमके स्टॅलिन यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष केले. यावेळी, एमके स्टॅलिन म्हणाले, 'आयकर विभाग सांगत आहेत की संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच दुमई मुरगन यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. जर असे असेल तर नरेंद्र मोदींच्या घरी करोडो रुपये असतील, असे मी सांगितले. तर तुम्ही त्यांच्या घरावर छापा टाकणार काय? असा सवाल एमके स्टॅलिन यांनी आयकर विभागाला केला आहे.'
उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. यंदाच्या निडणुकीसाठी त्यांच्या पार्टीकडून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात येत आहे, असा आरोप करत एमके स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामी किंवा उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्यावर सुद्धा आयकर विभाग छापा टाकणार का, असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला.
गेल्या काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या काळात पैशांचा बेकायदा वापर होत असल्याच्या संशयावरुन डीएमकेचे खजिनदार दुमई मुरुगन यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. यावेळी त्यांच्याकडून 10 लाख रुपयांची रोक रक्कम जप्त करण्यात आली होती. याशिवाय, कर्नाटकातील काही नेत्यांच्या घरांवर सुद्धा आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. यावरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. निवडणुकांच्याआधी अशाप्रकारे कारवाई करुन एजन्सींचा केंद्र सरकार चुकीचा वापर करत असल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे.