manipur violence news : मणिपूरमधील हिंसाचार आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांनी देशभर संतापाची लाट उसळली आहे. विवस्त्र अवस्थेत महिलांची धिंड काढून काही नराधमांनी राज्यात दहशत पसरवली आहे. मागील दोन महिन्यांपासून ईशान्येकडील हे राज्य हिंसाचाराच्या आगीत जळते आहे. महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढून दहशत माजवणाऱ्या नराधमांना मणिपूर पोलिसांनी अटक केली असली तरी देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मणिपूरच्या घटनेवरून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.
मणिपूरमध्ये स्वातंत्र्यसैनिकाच्या ८० वर्षीय पत्नीला जिवंत जाळण्यात आले. कारगिल युद्धात आपल्या देशासाठी लढलेल्या सैनिकाच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि कपड्यांशिवाय धिंड काढण्यात आली. इतरांना देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटणारे आता कुठे आहेत?, असा प्रश्न ठाकरेंनी केला. तसेच स्वातंत्र्यसैनिक किंवा सैनिकांचे टॅग नसला तरीही महिलांवर असे अत्याचार होणं आणि सरकारने गप्प बसणं ही देशासाठी शरमेची गोष्ट आणि भीषण शोकांतिका आहे. म्हणूनच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची ताबडतोब हकालपट्टी करून तिथे राष्ट्रपती राजवट आणण्याची गरज आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनीभाजपा सरकारला लक्ष्य केले.
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी करा - ठाकरे
मागील काही दिवसांपासून व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने मणिपूरमधील भीषण अवस्था जगासमोर आणली. इथे काही टाळक्यांनी विवस्त्र अवस्थेत महिलांची धिंड काढून माणुसकीला काळीमा फासली. सातत्याने महिलांवर होत असलेला अत्याचार, हत्या आणि जाळपोळ यामुळे मणिपूर आजही हिंसाचाराच्या आगीने धगधगत आहे.
दरम्यान, मणिपूरमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा यासाठी मैतेई समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी ३ मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मार्च' आयोजित केल्यानंतर हिंसाचार सुरु झाला होता. राज्याच्या लोकसंख्येपैकी ५३ टक्के असलेला मैतेई समुदाय प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात राहतो. तर नागा आणि कुकी सारख्या आदिवासी समुदायांची लोकसंख्या ४० टक्के आहे आणि ते प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.