गया : बिहारमध्ये सत्ताधारी जद (यू) पक्षाच्या विधान परिषद सदस्य मनोरमादेवी यांचे फरार पुत्र राकेश रंजन यादव उर्फ रॉकी यादव याला एका युवकाच्या हत्येप्रकरणी मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली. रॉकीने ६ आणि ७ मेच्या रात्री एका युवकाची गोळी घालून हत्या केली होती. तेव्हापासून तो फरार होता.गया जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक गरिमा मलिक यांनी सांगितले की, रॉकी याला आदित्य याच्या हत्येप्रकरणी मंगळवारी सकाळी ‘बे्रटा कंपनी’च्या पिस्टलसह पकडण्यात आले. या पिस्टलचा त्याने हत्याकांडात वापर केला होता. बोधगया ठाणेअंतर्गत असलेल्या त्याचे वडील बिंदेश्वरी यादव यांच्या मालकीच्या मिक्सर प्लँट परिसरात तो आढळला.त्याच्या चेहऱ्यावर काळा मास्क लावून मंगळवारी सकाळी त्याला पत्रकारांसमोर पेश करताना गरिमा मलिक म्हणाल्या की, चौकशीत रॉकी याने त्याचा गुन्हा स्वीकारला आहे. रॉकीने आत्मसमर्पण केले आहे की, त्याला अटक करण्यात आली? असे विचारले असता त्याला अटकच करण्यात आल्याचे गरिमा मलिक यांनी स्पष्ट केले.गया जिल्ह्याच्या रामपूर ठाण्याच्या परिसरातकार ओव्हरटेक करण्यावरून वाद झाल्याने रॉकीने आदित्यला गोळी घालून ठार मारले होते. रॉकी याचे वडील बिंदेश्वरी यादवही कुख्यात गुन्हेगार म्हणून ओळखले जातात. या प्रकरणी मनोरमादेवी यांचा एक अंगरक्षक राजेशकुमार याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.या हत्याकांडात वापरण्यात आलेले पिस्टल ‘रॉकी’च्या नावाने दिल्ली येथून जारी करण्यात आले आहे. ज्या ‘रेंज सेव्हर’ गाडीतून रॉकी जात होता, ती गाडीही रॉकीच्याच नावावर आहे. तपासासाठी पोलिसांचे एक पथक दिल्लीला गेलेआहे. तेथे हे पथक रॉकीच्या पिस्टलच्या लायसन्सबाबत शोध घेत आहे. घटना घडली त्या वेळी रॉकी नशेत होता की नाही यालाही आतापर्यंत तपासात दुजोरा मिळालेला नाही. सोमवारी मनोरमादेवी यांच्या निवासस्थानी मारण्यात आलेल्या छाप्यात काही सामग्री जप्त करण्यात आली. त्यात दारूच्या काही बाटल्याही सापडल्या आहेत. या प्रकरणी बिंदेश्वरी यादव व रॉकी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.रॉकी पळून जावा म्हणून मनोरमादेवी यांनी मदत केली काय? असे विचारले असता गरिमा म्हणाल्या की, या प्रकरणी तपास सुरू आहे. या प्रकरणाशी ज्यांचा ज्यांचा संबंध आढळेल, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.
आमदारपुत्र रॉकी यादव अखेर अटकेत
By admin | Published: May 11, 2016 3:27 AM