जयपूर - राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात केवळ इच्छाशक्ती दाखवत सरकारी मदतीशिवाय 125 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आलंय. विशेष म्हणजे फक्त एका रात्रीत, 48 तासांत स्थानिक आमदार आणि उद्योजकांच्या मदतीने हे कोविड सेंटर उभारण्यात आलंय. काही दिवसांपूर्वीच येथील बायतू परिसरात 100 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले होते. मात्र, ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात घेऊन जवळच आणखी 25 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आलंय.
बाडमेर जिल्ह्यात 48 तासांत 2 कोविड सेंटर उभारण्यात आल्याने येथील ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे. स्थानिक आमदार आणि सामाजिक कार्यातील अग्रेसर असलेल्या लोकांनी तात्पुरत्या स्वरुपाचे हे कोविड सेंटर उभारले आहे. पेट्रोलियम आणि ऑईल कंपन्यांच्या कामाचा अनुभव असल्याने कंटेनरमध्ये हे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये काही ऑक्सिजन बेडचीही सोय करण्यात आली आहे.
बाडमेरपासून 100 किमी अंतरावर असलेल्या बायतू येथे काही दिवसांपूर्वीच 100 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले होते. तेथे, 30 बेड ऑक्सिजनचे ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर, आता सांभर येथे 25 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले असून येथेही 2 ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे. येथील स्थानिक आमदार हरीष चौधरी यांच्या पुढाकाराने हे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. त्यासाठी, सरकारकडून एकही रुपया घेण्यात आला नसल्याचे चौधरी यांनी सांगितले.
हे कोविड सेंटर बनविण्यासाठी अनेकांनी मदत केली आहे, आता आम्ही हे सेंटर सरकारच्या स्वाधीन करणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, बाडमेरच्या कोविड सेंटरमध्ये 100 बेड असून सुरुवातीला 10 बेड ऑक्सिजनचे होते, आता आणखी 6 बेड वाढविण्यात आल्याने, येथे एकूण 16 ऑक्सिजन बेड कार्यरत असल्याचे डॉ. जोगेश चौधरी यांनी सांगितले. डॉ. चौधरी हे सध्या बायतू येथील सेंटरमध्ये कार्यरत आहेत.