लोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : हरयाणात जननायक जनता पार्टीच्या (जजपा) आमदाराला थापड लगावल्याप्रकरणी पोलिसांनी ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हरयाणा अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष डाॅ. रवींदर सिंह बलियाला यांनी राज्याचे पोलिस महासंचालक पी. के. अग्रवाल यांना पत्र पाठवून आरोपींविरुद्ध कारवाई करण्यास सांगितले होते.
जजपाचे ज्येष्ठ नेते ईश्वर सिंह हे कैथल जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना भाटिया गावात त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. ते लोकांच्या समस्या ऐकून घेत असताना एका महिलेने त्यांना थापड लगावली होती. या घटनेनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आमदार सिंह यांना बाजूला नेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली होती. जजपाचे प्रदेशाध्यक्ष निशान सिंह यांनी या घटनेचा निषेध करताना ज्येष्ठ नेत्याला अशी वागणूक मिळायला नको होती, असे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी ही घटना राजकीय हेतूने प्रेरित असल्याचाही आरोपही केला.
अनुसूचित जाती महासभेच्या बैठकीत या घटनेचा निषेध करून आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर आयोगाने दखल घेत कारवाईसाठी पोलिस महासंचालकांना पत्र पाठवले. आ. सिंह यांनी ही घटना अत्यंत संयमाने घेतली होती. त्यांनी संबंधित महिलेविरुद्ध तक्रारही दिली नव्हती. लोकांचा राग स्वाभाविक आहे.