हैदराबाद:तेलंगणातील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार टी राजा यांना पक्षाने निलंबित केले आहे, तसेच येत्या 10 दिवसात या प्रकरणावर उत्तर मागितले आहे. टी राजा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यामुळे हैदराबादमध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. त्यांना हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटकही केली. पण, आता पक्षाने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.
टी. राजा यांनी नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला, ज्यामध्ये त्यांनी मुस्लिम धर्मगुरू प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुस्लिम समुदायाने सोमवारी रात्री पोलिस आयुक्त सीव्ही आनंद यांच्या कार्यालयासमोर आणि शहरातील अनेक भागात निदर्शने सुरू केली. त्यांच्या अटकेच्या मागणीवर आंदोलक ठाम होते. या व्हिडिओमध्ये टी. राजा यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकीवरही भाष्य केले आहे.
यापूर्वी अनेक वादात नाव
टी राजा सिंह यांनी यापूर्वी अनेकदा आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. या वर्षी जूनमध्ये हैदराबाद पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. टी राजा सिंह यांच्याविरोधात हैदराबादचे रहिवासी मोहम्मद अली यांनी तक्रार दाखल केली होती. त्याने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, टी राजा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये राजा सिंह अल्पसंख्याक समुदायाबद्दल अपमानास्पद बोलतांना दिसत होते. याप्रकरणी कांचनबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
43 गुन्हे दाखल असल्याची माहिती
टी राजा सिंह यांनी 2018 मध्ये दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या विरोधात 43 गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली होती. त्यापैकी 16 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर द्वेश पसरवल्याप्रकरणी 17 तर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल असल्याची माहिती देण्यात आली.