बंगळुरू - मागील एक वर्षांपासून कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनी देशाचं लक्ष वेधून घेतलं होत. मात्र काँग्रेस-जेडीएसचे सरकार पडल्यानंतर या घडामोडी शांत झाल्या. भाजपने कर्नटाकमध्ये सरकार स्थापन करून काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरला बाजूला केले. यात सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका ठरली ती काँग्रेसच्या १४ बंडखोर आमदारांची. या आमदारांनी राजीनामा दिल्याने कुमारस्वामी यांना मुख्यंमत्रीपदाची खुर्ची सोडवी लागली. काँग्रेस सोडणाऱ्या याच १४ बंडखोर आमदारांपैकी एमटीबी नागराज यांनी तब्बल ११ कोटी रुपयांची कार खरेदी केली आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
नागराज यांनी रोल्स रॉयस फँटम VIII नावाची अलिशान कार खरेदी केली. या कारची किंमत ११ कोटी रुपये असली तरी टॅक्सनंतर आणखी किंमत वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस-जेडीएस सरकारमधील एकूण १७ आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे राजातील युतीचे सरकार कोसळले. परंतु, त्याचवेळी विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या १४ आमदारांना अयोग्य ठरवून निलंबित केले. याच आमदारांमध्ये एमटीबी नागराज यांचा समावेश होता.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागराज यांनी कारचा टॅक्स अदयाप चुकवलेला नाही. रोल्स रॉयस सारखी अलिशान कार खरेदी करणारे नागाराज कर्नाटकमधील एकमेव नेते नसून खाण उद्योजक जनार्दन रेड्डी यांच्याकडेही अशीच कार आहे. नागराज यांनी महागडी कार खरेदी केल्यामुळे कर्नाटकमध्ये कुणालाही आश्चर्य वाटले नसून नागराज देशातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक आहे. त्यांनी निवडणुकीच्या वेळी आपल्याकडे एक हजार कोटींची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.
काँग्रेस नेते डी. शिवकुमार यांनी नागराज यांना आमदारकीचा राजीनामा परत घेण्यासाठी सांगितले होते. परंतु, नागराज यांनी आपला निर्णय बदलला नाही. नागराज यांच्या रोल्स रॉयल्स कारचा फोटो काँग्रेस प्रवक्ते निवेदीत अल्वा यांनीच ट्विट केला आहे.