भोपाळ - मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपावर आरोप लावला होता. सरकार बनवण्यासाठी काँग्रेस आमदारांना पैसे देऊन घोडेबाजार करण्यात येत आहे. एका आमदाराला २५-३५ कोटी रुपये देण्यात येत आहेत, याचे पुरावेही माझ्याकडे आहे असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केलं होतं.
दिग्विजय सिंह यांच्या आरोपावर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांना जर फुकटचा पैसा मिळत असेल तर त्यांनी घ्यावा असं विधान त्यांनी केलं आहे. आमदारांनी मला सांगितलं आम्हाला इतके पैसे देण्याची ऑफर देत आहेत. मी आमदारांना फुकटचे पैसे मिळत असतील तर घ्यायला हवे असं सांगितलं आहे अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.
2018 मध्येही भाजपाने सरकार स्थापण्यासाठी काही कॉंग्रेसचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कॉंग्रेसच्या आमदारांनी त्यांची कल्पना नाकारल्याने मोहीम फोल ठरली. तसेच, शिवराजसिंह चौहान आणि नरोत्तम मिश्रा यांच्यात मुख्यमंत्री होण्यासाठी मतभेद होते. मात्र आता त्यांनी एकमत केलं असून जर त्यांना राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ मिळालं तर चौहान यांना मुख्यमंत्री केले जाईल आणि मिश्रा यांना उपमुख्यमंत्री बनतील असं ठरलं आहे असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. तसेच पाच ते सात आमदारांना भाजपा नेत्यांचे फोन आले आहेत. ज्यामध्ये त्याला पहिला हप्ता म्हणून पाच कोटी रुपये आणि राज्यसभा निवडणुकीनंतर उर्वरित पैसे देवू असं सांगण्यात आलं आहे.
मध्य प्रदेश विधानसभेच्या 230 सदस्यांमध्ये कॉंग्रेसचे 114 आमदार आहेत. त्यांच्याकडे चार अपक्ष आमदार, बसपाचे दोन आमदार आणि सपाच्या एका आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपाकडे 104 आमदार आहेत. या महिन्यात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणुका होणार आहेत. भाजपाकडे सध्या तीन पैकी दोन जागा आहेत.
राज्यसभेच्या एका जागेसाठी 58 मते आवश्यक राज्यसभेच्या एका जागेसाठी कोणत्याही पक्षाला 58 मतांची आवश्यकता आहे. एक जागा भाजपा आणि कॉंग्रेस सहजतेने जिंकू शकतात. त्याचबरोबर तिसर्या जागेसाठी भाजपाकडे 49 आणि कॉंग्रेसकडे 56 मते आहेत. ज्यामुळे अपक्ष आणि दोन्ही पक्षांची मते अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.