आदेश रावल
नवी दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक शनिवारी पार पडली असून, यात १६० जागांवर चर्चा झाली. यापैकी समितीने ९५ जागांवर प्रत्येकी एका नावावर यापूर्वीच सहमती केली होती.
सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येने आमदारांची तिकिटे कापण्यावर विचार सुरू असल्याचे समजते. त्यानंतर अनेक आमदारांनी दिल्लीत संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेऊन सांगितले की, आम्ही ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबरोबर गेलेलो नाहीत. आम्ही पक्षाला साथ दिली व आता पक्ष आमचे तिकीट कापण्याबाबत विचार करीत आहे. या सर्व घडामोडींची माहिती ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना देण्यात आली आहे.
मध्यप्रदेशचे सरचिटणीस प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला व माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हेही आमदारांच्या विचारांशी सहमत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, पक्षाशी प्रामाणिक राहणाऱ्या आमदारांना बक्षीस मिळाले पाहिजे. त्यामुळे सर्वेक्षणामध्ये ज्या आमदारांची स्थिती फारच कमकुवत असल्याचे पुढे आले आहे, ते सोडून उर्वरित सर्वांना तिकीट देण्याबाबत सखोल विचारविनिमय करण्यात आला. १६५ जागांवर दोन नावांचे पॅनल तयार करण्यात आले आहे. सध्या पितृपक्ष सुरू असल्यामुळे काँग्रेस मध्य प्रदेशची पहिली यादी १४ ऑक्टोबरनंतर येण्याची शक्यता आहे.