पाटणा - कोरोना महामारीच्या संकटात अनेकांनी आपले जिवलग गमावले आहेत. गरिबांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांनाच या दु:खाचा सामना करावा लागला आहे. या रोगामुळे कित्येक दिग्गजांचेही प्राण गेले आहेत. त्यामुळे, प्रशासन व्यवस्था आणि राज्यकर्त्यांविरुद्ध आवाज उठवला जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा आमदाराचामृत्यू झाला होता. त्यावेळी, त्यांच्या मुलाने सरकारविरुद्ध तीव्र शब्दात संताप व्यक्त केला होता. आता बिहारधील जदयूच्या आमदारानेही पत्नीच्या निधनानंतर संताप व्यक्त केलाय.
कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर आमदार अचमित ऋषिदेव यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यानंतर, जदयू आमदाराने राज्याच्या आरोग्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. रानीगंज मतदारसंघातील या आमदारांनी सरकारप्रति मोठी नाराजी व्यक्त केली आहे. आमदार अचमित यांच्या पत्नीला व्हेंटीलेटरची आवश्यकता होती. मात्र, त्यांच्या मतदारसंघातील अररिया येथील रुग्णालयात केवळ 6 व्हेंटीलेटर उपलब्ध होते, पण ते सक्रीय नव्हते. त्यामुळे, या रुग्णालयात त्यांच्या पत्नीला उपचार मिळाले नाहीत. त्यानंतर, अचमित यांनी फोर्ब्सगंज येथील रुग्णालयात त्यांनी पत्नीला दाखल केले. मात्र, दुर्दैवाने त्यांचे प्राण वाचविण्यात अपयश आले. त्यामुळे, अचमित ऋषिदेव यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यातील लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयांना जर रुग्णालयात उपचार मिळत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांचे हाल काय होत असतील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. बिहारमध्ये सध्या कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. रविवारी सक्रीय रुग्णांची संख्या 40,691 एवढ होती. मात्र, कोरोनाबाधित मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या अद्यापही कमी होताना दिसत नाही. गेल्या 24 तासांत 107 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.