नवी दिल्ली : मिठी नदीचे रुंदीकरण करताना सीआरझेडच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने एमएमआरडीएला २५ लाख रुपयांचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे. मिठीचे रुंदीकरण करण्याच्या प्रक्रियेत तिथे केलेले बांधकाम आणि होत असलेले अन्य प्रकल्पांचे काम हाती घेताना त्यासाठी कायद्यान्वये आवश्यक त्या परवानग्या एमएमआरडीएने घेतल्या नाहीत, असा ठपका लवादाने ठेवला आहे.मिठी नदीचे रुंदीकरण करताना आणि पात्र खोल करण्यासाठी तिथे स्फोट (ब्लास्टिंग) करण्यात आल्याचे लवादाला आढळून आले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचे लवादाचे म्हणणे आहे. या पर्यावरणाच्या नुकसानाबद्दल एमएमआरडीएने या टप्प्यावर २५ लाख रुपये लवादाकडे जमा करावेत, असे हरित लवादाचे चेअरमन न्या. स्वतंत्रकुमार यांनी आदेशात नमूद केले आहे. तेथील बांधकामे व अन्य प्रकल्पांचे काम यामुळे पर्यारवणाचे नेमके किती नुकसान झाले आहे, हे राज्याच्या पर्यावरण परिणाम निर्धारण समितीने (एसईआयआयए) प्रत्यक्ष पाहणी करून निश्चित करावे, अशा सूचनाही लवादाने दिल्या आहेत. नदीच्या खाडी पात्रातून पाण्याचा निचरा होण्यासाठी त्या भागाचे संरक्षण होईल, याची काळजी घेण्यात यावी आणि त्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात यावीत, असे लवादाने आदेशात स्पष्ट केले आहे.
मिठी नदीप्रकरणी एमएमआरडीएला २५ लाखांचा दंड
By admin | Published: June 03, 2016 2:54 AM