चंडीगड : चंडीगड विद्यापीठाने अश्लील व्हिडिओ प्रकरणात (Chandigarh University MMS Scandal Row) निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून दोन वॉर्डनला निलंबित केले आहे. विद्यापीठ प्रशासनाने पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती विद्यार्थिनींच्या समस्याही ऐकून घेणार आहे. त्यानंतर समिती सर्व घडामोडींचा अहवाल विद्यापीठ प्रशासनाला सादर करणार आहे. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने बाहेरील व्यक्तीला कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली असून मीडियालाही कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जात नाही.
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या निदर्शनादरम्यान वसतिगृहाच्या वॉर्डनला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली होती. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने ही कारवाई केली आहे. वसतिगृहाच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी अनेक वॉर्डनही विभागांमध्ये बदलले जाऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. विद्यार्थिनींनी वसतिगृहातील वॉर्डन आणि कर्मचाऱ्यांबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली होती आणि मुलींच्या कपड्यांवर टोमणे मारल्याचे सांगितले होते. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थिनींच्या पेहरावावर प्रशासनाचा कोणताही आक्षेप नसल्याचे सांगितले होते. त्या आपल्या पालकांच्या सूचनेनुसार वसतिगृहात कपडे घालू शकतात.
निदर्शनादरम्यान विद्यार्थिनींचा आक्रमकपणा पाहून आता विद्यापीठ प्रशासन आपल्या उणिवा दूर करण्यात व्यस्त आहे. निदर्शन संपल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रक जारी करून 19 ते 24 सप्टेंबरपर्यंतचे वर्ग स्थगित करण्याचे जाहीर केले आहे. यादरम्यान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नेहमीप्रमाणे कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, चंदीगड विद्यापीठातील खराब वातावरणात विद्यार्थिनी आपापल्या घरी परतत आहेत. रविवारी रात्री उशिरा काही पालक मुलींना घरी घेऊन जाण्यासाठी पोहोचले होते.
दरम्यान, काल विद्यापीठातील एका विद्यार्थीनीने आपल्या मैत्रिणींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि ते इंटरनेटवर व्हायरल केले. हे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर वसतिगृहाच्या काही विद्यार्थीनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर विद्यापीठाच्या गेट नंबर 2 वर पीडित विद्यार्थीनींनी निदर्शने केली आणि कारवाईची मागणी केली. पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि पोलिसांकडून योग्य त्या कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर पीडित विद्यार्थीनी शांत झाल्या आहेत.