संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मनरेगा घोटाळा उघडकीस आला असून, बनावट जॉब कार्डद्वारे पैसे गोळा करणाऱ्यांवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे.
पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही मनरेगाच्या नावाखाली बनावट जॉब कार्ड वापरून पैसे घेणारे लोक लवकरच सापळ्यात अडकणार आहेत. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, जॉबकार्ड आधारशी लिंक करण्याचा मोठा घोटाळा देशभरात उघडकीस आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये २५ लाखांहून अधिक बनावट जॉब कार्डची प्रकरणे समोर आली आहेत, परंतु महाराष्ट्रही यापासून दूर राहिलेला नाही. महाराष्ट्रात आतापर्यंत बनावट एक लाखाहून अधिक बनावट जॉबकार्डचा शोध लागला आहे. त्या बनावट जॉबकार्डद्वारे मनरेगाच्या पैशांची लूट करणारा हा घोटाळा उघडकीस आला आहे. आता या सर्वांचा तपास करण्यात येत आहे. त्यात काय समोर येते ते पाहावे लागेल.
दिवसाचा पगार किती?२०१९-२० मध्ये प्रत्येक मजूराला दिवसभराच्या कामाचे वेतन १९८ रुपये देण्यात येत होते. २०२०-२१ मध्ये हे वेतन २२४ रुपये करण्यात आले. २०२१-२२ मध्ये वेतनात आणखी वाढ करून ते २३५ रुपये करण्यात आले. २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षात मनरेगातील मजूरांना अनुक्रमे २४२ रुपये आणि २५८ रुपये वेतन देण्यात आले आहे.
बंगाल एकटे नाही, देशातील अनेक राज्ये मनरेगातील लुटीच्या प्रकरणांची चौकशी करत आहेत. या लुटीचा पर्दाफाश झाला आहे. जॉब कार्ड आधार कार्डशी लिंक करून एकाच व्यक्तीने अनेक जॉबकार्ड बनवून घेतल्याचे तसेच अनेक जॉबकार्डचा आधार क्रमांक सुद्धा एकच असल्याचे बँक खात्यांवरून उघड झाले आहे. पश्चिम बंगालमधून सुरू झालेला मनरेगा घोटाळ्याचा तपास लवकरच देशाच्या अनेक भागात पोहोचणार आहे.- गिरीराज सिंह, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री
पैसा जातो कोठे?मनरेगाच्या लुटीमुळे केंद्र सरकारने संपूर्ण पश्चिम बंगालला दिली जाणारी मनरेगाची रक्कम थांबवली आहे, या विरोधात पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी नुकतीच दिल्लीतील कृषी भवनात निदर्शने केली होती. अनेक वर्षांपासून ही लूट सुरू असून मनरेगाचा पैसा कुठे जातो आणि गरजूंना का मिळत नाही, हे कोणी पाहत नसल्याचे गिरीराज सिंह यांनी सांगितले.