मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे लवकरच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ही भेट घडू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित यांचा विवाहसोहळा 27 जानेवारीला संपन्न होणार आहे. या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे दिल्लीत राहुल यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्यानं या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित यांचा विवाह 27 जानेवारीला मिताली बोरुडेसोबत होणार आहे. या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे लवकरच दिल्लीला जाणार आहेत. त्यावेळी ते राहुल गांधींची भेट घेणार असल्याचं समजतं आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्या माध्यमातून ही भेट होऊ शकते. या भेटीच्या समन्वयाची जबाबदारी देवरा यांच्याकडे आहे. राहुल आणि राज यांच्याकडून सतत पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं जातं. त्यामुळे या भेटीत नेमकं काय होणार, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. राज ठाकरे व्यंगचित्रांच्या माध्यमातून सतत मोदींवर निशाणा साधतात. मोदी सरकारचे विविध निर्णय, त्यांचे परदेश दौरे, गेल्या महिन्यात तीन राज्यांमध्ये झालेला भाजपाचा पराभव अशा विविध मुद्द्यांवरुन राज यांनी मोदींना फटकारे लगावले आहेत. तर राहुल यांना राफेल डीलवरुन मोदींना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी या दोन मोदी विरोधकांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे दिल्लीत राहुल गांधींना भेटणार? 'राज'कीय वर्तुळात चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 5:21 PM