मुंबई/अयोध्या: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुढील महिन्यात अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा राज यांनी लावून धरला आहे. भोंगे उतरवणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारचं त्यांनी कौतुक केलं. पुढच्या महिन्यात राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याला भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध केला आहे.
मनसेकडून राज यांना हिंदूजननायक अशी उपाधी दिली असताना ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज यांचा उल्लेख खलनायक असा केला. राज यांच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती, याची आठवण सिंह यांनी करून दिली. राज यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. राज यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.
दुसरीकडे भाजपचे फैझाबादचे खासदार लल्लू सिंह यांनी राज यांच्या स्वागत केलं आहे. आम्ही रामाचे सेवक आहोत. त्यामुळे प्रभूरामाच्या दर्शनाला येत असलेल्या राज यांचं आम्ही स्वागत करू. प्रभूरामानं त्यांना सद्बुद्धी द्यावी आणि त्यांनी पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रासाठी काम करावं, असं सिंह म्हणाले. लल्लू सिंह लोकसभेत फैझाबाद मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. याच मतदारसंघात अयोध्या शहर येतं.