raj thackeray on manipur violence : मणिपूरमधील वाढत्या हिंसाचारावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कालपासून समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात दोन्हीही सरकारांना आलेले अपयश पाहता मोदी सरकारला विरोधक लक्ष्य करत आहेत. मणिपूर राज्यात देखील भाजपाचे सरकार आहे पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर देखील हिंसा रोखण्यात प्रशासनाला अपयश आले. अशातच काही लोक २ महिलांची नग्न धिंड काढत असल्याचा व्हिडीओ समोर येताच अनेकांनी संताप व्यक्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील 'जैसे थे' परिस्थितीवरून सरकारचा समाचार घेतला.
"कालपासून मणिपूर मधली समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत, आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान महोदयांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी ह्या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल हे पहा, पण परिस्थिती 'जैसे थे' आहे. आणि हेच दुर्दैव आहे. ह्या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. पण त्याचवेळेस जर केंद्रसरकारकडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपती महोदयांनी ह्यात लक्ष घालायला हवं", असं राज ठाकरेंनी म्हटले आहे.
...तर ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल - राज तसेच मणिपूरमध्ये गेल्या ३ महिन्यात जे घडलं त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण भारताच्या समाजमनावर ओरखडा उमटला आहे आणि ह्यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल. पंतप्रधानांनी आत्ता जरी ह्या घटनेचा निषेध केला असला तरी तो पुरेसा नाही, आता कृती करा, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल, असे राज यांनी आणखी नमूद केले.
अमित शहांचे मुख्यमंत्र्यांना निर्देशमणिपूरमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यासंदर्भात गृहमंत्री, अमित शाह यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यासोबत चर्चा केली आहे. तसेच, व्हिडीओ प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. यातच, घटनेतील मुख्य आरोपीला थाउबल येथून अटक केल्याचेही समजते. तसेच इतर आरोपींचा शोध सुरू आहे.