लखनौ - मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला एकप्रकारे इशाराच दिला आहे. मशिदींवरील भोंगे 3 मेपर्यंत हटविण्याचे त्यांनी आपल्या ठाणे येथील भाषणात म्हटले. त्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखलाही त्यांनी दिला होता. मनसेच्या या भूमिकेनंतर राज्यातील वातावरण तापलं असून हनुमान चालिसा म्हणण्यासाठी स्पर्धाच लागल्याचं दिसून येत आहे. मात्र, राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचा थेट परिणाम उत्तर प्रदेशातही दिसून आला. येथील पोलिसांनी विविध प्रार्थनास्थळांवरील तब्बल 10,923 भोंगे उतरविण्यात आल्याचा दावा केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी हे लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत. तर, 35,221 ठिकाणी आवाजाच्या मर्यादेतच लाऊडस्पीकर वाजविण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानंतर, पोलिसांनी कारवाई करत बुधवारपर्यंत राज्यातील विविध प्रार्थनास्थळाहून तब्बल 10,923 लाऊडस्पीकर काढून घेतले आहेत. एका परिसरातून बाहेर जावा, एवढा आवाज लाऊडस्पीकरमध्ये नसावा, लोकांना या ध्वनीक्षेपकाचा कुठलाही त्रास होता कामा नये, असे योगींनी म्हटले होते.
उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनिश कुमार अवस्थी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार, राज्यातील विविध प्रार्थनास्थळावरील नियमबाह्य लाऊडस्पीकर हटविण्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठीचा आदेश 25 एप्रिल रोजी काढण्यात आला असून 30 एप्रिलपर्यंत अंमलबजावणी करण्याचेही या आदेशात म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारची भूमिका
मशिदी किंवा मंदिरांवरील परवानगी घेऊन लावलेले भोंगे काढणार नाही, अशी स्पष्ट भूमिका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी जाहीर केली आहे. कोर्टानं परवानगी घेऊन लावलेले भोंगे काढण्याचा कोणताही आदेश दिलेला नाही, असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी राज्य सरकारने प्रार्थनास्थळांवरील भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेतली होती. त्यातही, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वांचे एकमत झाले आहे.