बंगळुरु - अवैध गोहत्येची तक्रार केली म्हणून मारहाण करण्यात आल्याचा आरोप बंगळुरुतील एका महिलेने केला आहे. एनआयएने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने शहराबाहेरील तलघट्टापुरा परिसरात सुरु असलेल्या अवैध गोहत्येसंबंधी पोलिसांना माहिती दिली होती. नंदिनी असं या महिलेचं नाव असून, पोलिसांनी काहीतरी गडबड केल्याचा आरोप महिलेने केला आहे. नंदिनी यांनी सांगितलं आहे की, 'जेव्हा मी पोलिसांना यासंबंधी माहिती दिल्ली, तेव्हा त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण जेव्हा असं झालं नाही तेव्हा फसवणूक झाली असल्याचं माझ्या लक्षात आलं'.
'जेव्हा आम्ही त्या परिसरात गेलो, तेव्हा तिथे बेकायदेशीरपणे गोहत्या सुरु असल्याचं दिसलं. तिथे 14 गायी बांधून ठेवण्यात आल्या होत्या, ज्यामधील दोन बछड्यांना कापण्यासाठी शेजारच्या रुममध्ये नेण्यात येत होतं. प्राण्यांवरील प्रेमामुळे आम्ही लगेचच तलघट्टापुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. कारवाई केली जात असून, पोलीस त्या पसिरात पोहोचले आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं', अशी माहिती नंदिनी यांनी दिली आहे.
नंदिनी यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'जेव्हा आम्हाला कोणतीच अपडेट मिळाली नाही, तेव्हा आम्ही माझ्यासोबत असणा-या तक्रारदार सहकारी आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना घेऊन घटनास्थळी गेलो. ज्याप्रमाणे आम्हाला सांगण्यात आलं होतं, त्याप्रमाणे तिथे पोलिसांचा कडक बंदोबस्त असेल असं आम्हाला वाटलं होतं. पण तिथे कोणीच नव्हतं. आपण जाळ्यात अडकलो आहोत असं मला वाटू लागलं. जमावाने आमच्यावर विटा, काचेच्या बाटल्या फेकण्यास सुरुवात केली आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यास सुरुवात केली. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव होता'. जमावाने केलेल्या दगडफेकीत नंदिनी यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून, प्रचंड नुकसान झालं.
'आम्ही जिवंत बाहेर पडू असं मला वाटलंच नव्हतं. काही मिनिटात 150 ते 200 लोक जमा झाले आणि आमच्यावर हल्ला सुरु केली. आम्हाला वाचवण्यासाठी तिथे पोलीसही उपस्थित नव्हते. अशा प्रकारे फक्त गुन्हेगारच वागू शकतात. माफिया इतक्या कमी वेळात एवढी लोक जमा करु शकत नाहीत. यामध्ये पोलीसदेखील सामील असल्याची माझी खात्री आहे. जर पोलिसांनी कर्तव्य बजावलं असतं, तर एका महिलेला एवढा धोका पत्करावा लागला नसता', असं नंदिनी यांनी सांगितलं आहे.
माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपला निषेध व्यक्त करत मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्यावर टीका केली आहे.