उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. देशातील विविध भागातून त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी भाविक प्रयागराज येथे येत आहेत. दरम्यान, झाशीहून प्रयागराज येथे जात असलेल्या ट्रेनवर हरपालपूर स्टेशनवर जमावाकडून हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. दगडफेक, तोडफोडीसह झालेल्या या हल्ल्यामुळे ट्रेनमधील प्रवासी भयभीत झाले.
ही घटना झाशी विभागातील हरपालपूर स्टेशन परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्याशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये जमावामधील अनेक लोक ट्रेनच्या डब्यावर दगडफेक करताना दिसत आहेत. हा जमाव ट्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आतमध्ये प्रवेश करता न आल्याने या जमावाने डब्याचे दरवाजे आणि खिडक्या तोडल्या.