सिलचर : आसाममधील तीनसुकिया जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी गुरुवारी पाच बंगाली मजुरांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्या पार्श्वभूमीवर या राज्याच्या कचर जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी संतप्त जमावाने केलेल्या जबर मारहाणीत दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून काही शस्त्रे व दारूगोळा पोलिसांनी जप्त केला.हरीनगर येथील बसस्टॉपवर संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत हे दोेघे संशयित दहशतवादी गंभीर जखमी झाले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सिलचर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दोघांकडून तीन एके-५६ रायफली, चिनी बनावटीची एलएमजी बंदूक, एक रायफल असा शस्त्रसाठा व दारूगोळा जप्त करण्यात आला. ठार झालेले दहशतवादी दिमा हसाओ जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.तीनसुकिया येथे दहशतवाद्यांनी ठार केलेल्यांच्या कुटुंबियांची तृणमूल काँग्रेसच्या चार सदस्यीय शिष्टमंडळाने रविवारी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या हल्ल्यामागील गुन्हेगारांना शोधून त्यांना कडक शिक्षा करावी, अशी मागणीही या पक्षाने केली.ठार झालेल्यांच्या कुटुंबांतील वारसदारांना प्रत्येकी एक लाख रुपयाची मदत या पक्षाने दिली आहे. या शिष्टमंडळात पक्षाचे नेते डेरेक ओब्रियन, लोकसभा खासदार ममता बाला ठाकूर, राज्यसभा खासदार नदिमूल हक व आमदार महुआ मोईत्रा यांचा समावेश होता.या हत्याकांडाचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही तीव्र निषेध केला होता. नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) प्रकाशित करण्यासाठी हालचाली सुरू असताना सिलचर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेण्याकरिता तृणमूल काँग्रेसच्या सहा खासदारांचे शिष्टमंडळ २ आॅगस्ट रोजी तिथे गेले होते; पण त्यांना विमानतळावरच अडविण्यात येऊन दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्यांना परत पाठवून दिले होते. (वृत्तसंस्था)
जमावाच्या मारहाणीत दोन अतिरेकी ठार, पाच मजुरांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 5:52 AM