अलवर (राजस्थान) - जमावाकडून होणाऱ्या हत्यांविरोधात देशभरात तीव्र वातावरण असतानाच गो तस्करी करत असल्याचा संशयावरून एका व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना राजस्थानमधील अलवर येथे घडली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मृत व्यक्ती दोन गाई आपल्यासोबत घेऊन जात असताना काही लोकांनी तो गो तस्करी करत असल्याचा आरोप केला आणि मारहाण करून त्याची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव अकबर असल्याचे समोर आले आहे. तो हरयाणातील कोलागाव येथील रहिवासी होता. दरम्यान या प्रकरणी दोन आरोपींनी अटक करण्यात आली आहे.
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रामगड परिसरात असलेल्या लल्लावंडी गावात ही घटना घडली आहे. येथे शुक्रवारी रात्री एक व्यक्ती दोन गाई नेत असताना जमावाने तो गो तस्कर असल्याच्या संशयावरून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्याची आलेली नाही.
अलवरचे एएसपी अनिल बेनिवाल यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले की, "मृत व्यक्ती गो तस्कर होता की नाही याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून आम्ही त्यांना लवकरच बेड्या ठोकू." दरम्यान अलवरचे खासदार करण सिंह यादव यांनी या प्रकरणी आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. याआधी 2017 साली अलवर जिल्ह्यातच गोतस्करीवरून पहलू खान याची हत्या झाली होती. जमावाने मारहाण करून त्याची हत्या केली होती. त्यावरून देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.