रांची - अफवा तसंच संशयातून मॉब लिचिंगसारख्या गुन्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीही गो-तस्करीच्या संशयावरुन राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात जमावानं केलेल्या मारहाणीत 28 वर्षीय अकबर खानचा मृत्यू झाला होता. या गंभीर समस्येवर आरएसएस नेता इंद्रेश कुमार यांनी अजब तोडगा शोधून काढला आहे. लोकांनी बीफ खाणं बंद करावं, म्हणजे मॉब लिचिंगसारख्या गुन्ह्यांवर आळा बसेल, असा अजब तोडगा इंद्रेश कुमार यांनी सुचवला आहे.
('मुस्लिमांच्या तुलनेत गाय सर्वाधिक सुरक्षित', शशी थरुर यांचं वादग्रस्त ट्विट)
आपण सर्व जण संकल्प करुन मानवतेला गोहत्यतेच्या पापातून का मुक्त करत नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. झारखंडमधील रांची येथील हिंदू जागरण मंचाच्या कार्यालयाचे संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी सोमवारी उद्घाटन केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय, जनतेवरही योग्य संस्कार करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणालेत. पुढे इंद्रेश कुमार असंही म्हणाले की, जर गोमांस खाणे बंद केले तर या घटनाही थांबू शकतात. कोणत्याही धर्मात गायींची कत्तल करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. ख्रिश्चनांमध्येही गायीला मातेचा दर्जा असून इस्लाम धर्मातील सर्वोच्च ठिकाण असलेल्या मक्का- मदीना येथेही गोहत्या हा गुन्हा मानला जातो.
नेमकी काय आहे घटना?
मूळ हरियाणा जिल्ह्याचा रहिवासी, पण राजस्थानात गोपालन व दूध व्यवसाय करणाऱ्या अकबर खानला रामगड गावी ठार करण्यात आले. तो हत्येसाठी गाय नेत असावा, असा संशय गोरक्षकांना आला आणि जमावानं त्याला ठार केले. त्याच्याबरोबर एक मित्रही होता. दोन जणांनी अन्य गावकऱ्यांना बोलावून त्यांना मारहाण केली. विचारपूस करण्याआधीच जमावानं त्याला व त्याच्या सहकाऱ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत अकबर खान मरण पावला. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. हरियाणातील कोलगाव येथून त्यानं गायी आणल्या होत्या आणि त्या घरी नेत होता, अशी माहिती समोर आली आहे. मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी अकबरच्या वडिलांनी केली आहे.