मणिपूरमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती हाताबाहेर होत चालली आहे. मैतेई आणि कुकी समाजांमध्ये सुरु असलेला हिंसाचार आताही थांबायचे नाव घेत नाहीय. डोंगररागांमध्ये अफस्पा पुढील सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आला आहे. दुसरीकडे आंदोलकांनी भाजपाचे कार्यालय जाळले आहे.
बुधवारी जमावाने थौंबल जिल्ह्यातील भाजपाच्या मंडळ कार्यालयाला आग लावली. सुरक्षादलांनी आग विझविली परंतू तोवर कार्यालयातील साहित्य जळून खाक झाले होते. या आगीच्या घटनेत कोणी जखमी झालेले नाहीय. पोलिसांनी जमावामध्ये कोणकोण होते याची चौकशी सुरु केली आहे.
यापूर्वी जूनमध्ये भाजपाच्या तीन कार्यालयांवर हल्ले झाले आहेत. जमावाने कार्यालये फोडून तोडफोड केली होती. सहा जुलैपासून बेपत्ता असलेल्या दोन विद्यार्थिनींची हत्या करण्यात आली आहे. यामुळे मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार वाढला आहे. जमावाने हिंसक निदर्शने केली आहेत. मंगळवारी रात्री आंदोलक आणि आरएएफ सुरक्षादलांमध्ये झटापट झाली. आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फेकण्यात आल्या. तसेच लाठीचार्जही करणअयात आला. यामध्ये ४५ लोक जखमी झाले आहेत. यात बहुतांश विद्यार्थी आहेत.
दोन्ही विद्यार्थ्यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सीबीआयचे संचालक अजय भटनागर बुधवारी आपल्या टीमसह इम्फाळला पोहोचले. मुख्यमंत्री बिरेन सिंग या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सतत संपर्कात आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.