ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. ऋषी कुमार नावाचा तरुण आपल्या कंपनीतलं काम संपवून घरी परतत असताना ही घटना घडली. कारमध्ये बसताच त्यांच्या खिशात ठेवलेल्या तीन वर्षे जुन्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला. मोबाईलला आग लागल्याने त्याचा पाय भाजला आहे.
ऋषी कुमारने दिलेल्या माहितीनुसार, त्याने कारचा दरवाजा उघडला आणि बसण्याचा प्रयत्न करताच त्याच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला. स्फोटामुळे त्याचे कपडे जळाले आणि त्याने लगेचच गाडीतून खाली उतरून आग विझवण्यास सुरुवात केली. जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
डॉक्टरांनी सांगितलं की, त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे आणि पूर्णपणे बरे होण्यासाठी सुमारे २० ते २५ दिवस लागू शकतात. ऋषीने सांगितलं की, हा मोबाईल त्याने तीन वर्षांपूर्वी १० हजार रुपयांना विकत घेतला होता. या घटनेनंतर तो मोबाईल वापरण्यास घाबरला असून कुटुंबातील इतर सदस्यांना मोबाईलचा वापर कमीत कमी करण्याचा सल्ला देत आहे.
रात्री झोपतानाही मोबाईल पलंगापासून दूर ठेवावा जेणेकरुन इतर कोणतीही दुर्घटना घडू नये असं त्याचं म्हणणं आहे. यानंतर ऋषी कुमार आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड घाबरले आहेत. लोकांनी मोबाईल जपून वापरावा आणि खराब झालेला किंवा जुन्या बॅटरी असलेला मोबाईल वापरू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.