नवी दिल्ली : गुगल प्ले स्टोअरवरील ६० अधिकृत ॲप्समध्ये ‘गोल्डोसन’नामक मालवेअर आढळून आला आहे. त्यामुळे जगातील १० कोटी अँड्राॅइड फोन वापरकर्त्यांच्या फोनमधील डेटाला धोका निर्माण झाला आहे.
‘एमसीॲफी’च्या रिसर्च टीमने हा मालवेअर शोधून काढला आहे. हा मालवेअर वापरकर्त्याच्या स्मार्टफोनमधील इन्स्टॉल्ड ॲप्स, वायफाय आणि ब्लूटूथने जाेडलेली उपकरणे, जीपीएस लोकेशन यांची माहिती चोरू शकतो. वापरकर्त्याला कळू न देता बॅकग्राउंडला ॲड क्लिक करून तो ॲड घोटाळाही करू शकतो. केवळ माहिती चोरण्यासाठीच हा मालवेअर डिझाइन करण्यात आला आहे. अँड्रॉइडच्या सर्वाधिक नव्या आवृत्तीतीलसुद्धा १० टक्के डेटा हा मालवेअर चोरू शकतो. यापैकी बहुतांश ॲप्स हे फाेटाे एडिटिंग आणि व्हिडीओशी संबंधित आहेत.हे आहेत धोकादायक ॲप्समालवेअर आढळलेल्या ॲप्समध्ये स्वाइप ब्रिक ब्रेकर, मनी मॅनेजर एक्स्पेन्स अँड बजेट, एलडॉटपॉइंट व एलडॉटपे यासारख्या १०-१० लाखांपेक्षा अधिक डाऊनलोड्स असलेल्या लोकप्रिय ॲप्सचा समावेश आहे.
मालवेअर असे करतो नुकसान हा मालवेअर दर दोन दिवसांनी सक्रिय होऊन स्मार्टफोनमधील माहिती चोरून सी २ सर्व्हरला पाठवतो. संसर्गित ॲप जेव्हा स्मार्टफोन वापरकर्ता उघडतो, तेव्हा हा मालवेअर स्मार्टफोनवर स्वत:ला रजिस्टर करून घेतो आणि फोनमधील माहिती गोळा करून दूरवरच्या सर्व्हरला पाठवायला सुरुवात करतो. संसर्गित ॲप्सला फोनमध्ये देण्यात आलेल्या परवानग्यांनुसार (परमिशन्स) मालवेअर फोनमधील माहिती चोरत राहतो. म्हणजेच जेवढ्या जास्त परवानग्या तेवढी माहितीची चोरी जास्त होणार.