नवी दिल्ली - स्मार्टफोन हा आता प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला तो लागतोच. स्मार्टफोनच्या मदतीन हल्ली अनेक कामं सोपी झाली आहेत. पण असं असताना काही धक्कादायक घटना देखील समोर आल्या आहेत. काही मोबाईलचे स्फोट होत असल्याच्या घटना याआधी कित्येकदा घडल्या आहेत अशीच एक भयंकर घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. कामाच्या गडबडीत मोबाईल चार्ज करून तो घाईघाईत चार्जिंगवरून काढून थेट आपल्या पँटच्या खिशात टाकायची अनेकांना सवय असते. पण ही सवय एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे.
आपला मोबाईल चार्ज करून एका तरुणाने आपल्या पँटच्या खिशात ठेवला आणि काही वेळातच त्याचा भीषण स्फोट झाला. पँटमध्येच मोबाईलचा ब्लास्ट झाल्याने तरुण गंभीररित्या भाजला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फरीदाबादच्या बल्लभगडमधील ही धक्कादायक घटना आहे. आकाश असं या तरुणाचं नाव आहे. कृष्ण कॉलोनीत तो राहतो. आकाशने दिलेल्या माहितीनुसार, हा मोबाईल तो बऱ्याच महिन्यांपासून वापरत होता.
बुधवारी फोनची बॅटरी संपली म्हणून आकाशने मोबाईल चार्जिंगला लावला. चार्ज झाल्यानंतर त्याने तो पँटच्या खिशात ठेवला. काही वेळाने त्याचा स्फोट झाला आणि त्याचा पाय भाजला. कुटुंबाने त्याला उपचारासाठी तातडीने बल्लभगडमधील एका सरकारी रुग्णालयात दाखल केलं. उपचारानंतर त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमर उजालाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मोबाईलचा वापर करताना कशी काळजी घ्यायची हे जाणून घ्या...
- मोबाईलसाठी जाड कव्हर वापरू नये
- जाड कव्हरमुळे मोबाईलमधील उष्णता बाहेर पडत नाही
- मोबाईल जास्तवेळ चार्ज करू नका
- मोबाईलचा संपर्क उन्हाशी येणार नाही याची काळजी घ्या
- अनावश्यक अॅप्लीकेशन डिलीट करून टाका
- इंटरनेट वापरताना, बोलताना मोबाईल गरम झाला तर वापर थांबवा
- रात्रभर मोबाईल चार्ज कधीही करू नका. ओव्हर चार्जमुळे बॅटरी खराब होते
तर फोन बंद ठेवा
अती तापमानाचा बॅटरीवर परिणाम होतो. त्यामुळे मोबाईल टीव्ही, फ्रीज अथवा अन्य इलेक्ट्रीक वस्तूंजवळ ठेवू नका. उन्हामध्ये फोन गरम होतो. काम नसेल तर काही काळ फोन बंद ठेवा. त्यामुळे मोबाईलचे तापमान नियंत्रणात राहते.
मोबाईल चार्ज करताना त्याच कंपनीचा आणि ओरिजनल चार्जरचा वापर करणे गरजेचे आहे.. दुसऱ्या कंपनीचे चार्जर किंवा डुप्लिकेट चार्जरमुळे फोनच्या बॅटरीला हानी पोहोचू शकते. बॅकग्राऊंड अॅप्लिकेशन कायम बंद ठेवावे. अनावश्वक अॅप्लिकेशन डिलिट केले तर मोबाईलच्या प्रोसेसरवर ताण येत नाही. इतके केले तरी मोबाईलचे तापमान नियंत्रणात राहिल.