उज्जैन: मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका फूटवेयर व्यापाऱ्याच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाला आहे. स्फोटानंतर व्यापाऱ्याची जीन्स जळून गेली आणि त्याचा पायदेखील भाजला. आग विझवण्याचा प्रयत्न करताना व्यापाऱ्याच्या एका हाताला इजा झाली. व्यापाऱ्याकडे रेडमीचा फोन होता.
निजातपुरा भागात गंगा फूटवेयर नावाचं दुकान चालवणाऱ्या निर्मल पमनानी यांच्या मोबाईलचा स्फोट झाला. शनिवारी दुपारी दुकानात बसले असताना ही घटना घडली. त्यावेळी निर्मल यांचा फोन त्यांच्या खिशात होता. फोन गरम झाल्यानं त्याचा स्फोट झाला. त्यामुळे जीन्सला आग लागली. निर्मल यांच्या शेजारी बसलेल्या त्यांच्या मित्रानं आग विझवली. जीन्स फाडून त्यांनी जळणारा मोबाईल बाहेर काढला. त्यानंतर निर्मल यांना रुग्णालयात नेण्यात आलं.
खिशात मोबाईलचा स्फोट झाल्यानं निर्मल यांच्या मांडीला दुखापत झाली. मांडीचा काही भाग भाजला. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात त्यांच्या एका हाताला इजा झाली. रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रात्रभर मोबाईल चार्ज केल्यानं हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. ओव्हरचार्जिंगमुळे मोबाईल तापतो आणि त्याचा स्फोट होतो. त्यासोबतच उन्हामुळेही मोबाईल तापतो. त्यामुळे मोबाईल वापरताना काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.