ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - पत्नीनं पतीविरोधात कोर्टात खटला दाखल केल्याचा राग काढण्यासाठी पतीने तिचा मोबाइल नंबर पॉर्न साइटवर पोस्ट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगत त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. या घटनेतील महिलेनं पतीविरोधात अप्राकृतिक संबंध आणि मारहाणीचाही आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर आरोपी पतीनं अटक टाळण्यासाठी हायकोर्टात अटकपूर्व जामीनाचा अर्ज केला होता. मात्र कोर्टानं तो फेटाळून लावला आहे.
शिवाय, पोलिसांनीही आरोपी पतीविरोधात तपासात सहकार्य करत नसल्याचाही आरोप केला आहे. त्यामुळे पोलिसांकडूनही त्याच्याविरोधात कारवाईचे पाऊल उचलण्यात येणार आहे. पत्नीनं दाखल केलेला खटला मागे घ्यावा यासाठी त्यानं तिच्यावर दबाव आणण्यासाठी पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारं कृत्य केले. आपल्याविरोधात केलेले आरोप मागे घ्यावा यासाठी आरोपी पतीनं पत्नीचा मोबाइल क्रमांक पॉर्न साइटवर पोस्ट केला. यामुळे महिलेला अश्लिल भाषा करणारे फोन आणि संदेश येऊ लागले. पतीच्या या निर्लज्ज कृत्यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं, असे तिनं सांगितले. पत्नीवर केवळ दबाव आणण्यासाठी आरोपी पतीने केलेले अगदी खालच्या स्तरावरील कृत्यांवर खडेबोल सुनावत कोर्टानं त्याला जामीन नाकारला आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर 2014 रोजी पीडित महिलेचं लग्न झालं. लग्नानंतर हे जोडपं हनीमूनसाठी न्यूझीलंडला गेले होते. हनीमूननंतर 3 जानेवारी 2015 रोजी दोघंही पुन्हा घरी परतले. यावेळी हनीमूनदरम्यान पतीनं माझ्यासोबत वाईट वर्तन केल्याचा आरोप महिलेनं केला. त्यानं अप्राकृतिक संबंध तसंच मारहाणही केल्याचं तिनं सांगितलं. याविरोधात आवाज उठवल्यानं पतीने तिचा मोबाइल क्रमांक चक्क पॉर्न साइटवर पोस्ट केला, अशी तक्रार खुद्द महिलेनं केली आहे. यासाठी त्यानं ऑफिसमधील लॅपटॉपचा वापर केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, हे सर्व आरोप आरोपी पतीनं फेटाळून लावले आहेत.
हनीमूनवेळी कोणत्याही प्रकारे शारीरिक संबंध होऊ शकलेले नाहीत. मला अडकवण्याचा प्रकार होत असल्याचं त्यानं कोर्टाला सांगितलं. यामुळे जामीन देण्यात यावा, असा अर्जही केला. मात्र कोर्टानं तो फेटाळून लावला.