मुंबई: भारतात मोबाईल नंबरसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रचलित पद्धतीत लवकरच दूरसंचार मंत्रालयाकडून मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. त्यामुळेच सध्याचा मोबाईलचा 10 आकडी नंबर जाऊन त्याजागी 13 अंकी मोबाईल नंबर येणार आहे. दूरसंचार मंत्रालयाने यासंदर्भात सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर्सना सूचित केले आहे. 8 जानेवारी 2018 रोजी यासंदर्भाती आदेश जारी करण्यात आला होता. त्यानुसार मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या प्रमुख कंपन्यांनी हा निर्णय अंमलात आणण्यासाठी कामाला सुरुवात केल्याचे समजते. मोबाईल नंबर अधिक सुरक्षित करण्यासाठी दूरसंचार मंत्रालयाकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचे समजते. 1 ऑक्टोबर 2018 पासून 10 अंकाचा नंबर 13 अंकी करण्यासाठी पोर्ट प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 31 डिसेंबर 2018 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मशिन टू मशिन नेटवर्क (M2M) असणाऱ्या ग्राहकांना 1 जुलै 2018 पासून 13 अंकी क्रमांकाचा वापर करणे अनिवार्य असेल. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर भारत हा सर्वात मोठा मोबाईल क्रमांक असणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरेल. सध्या चीनमध्ये 11 अंकी मोबाईल क्रमांकाचा वापर केला जातो. मात्र, या क्रमांकामध्ये एरिआ कोडचा समावेश नसतो. मात्र, या 13 अंकी क्रमांकामुळे भविष्यात अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. सध्या बँक आणि इतर ठिकाणी ग्राहकांना देणाऱ्या अर्जांमध्ये केवळ 10 अंकी मोबाईल नंबर नमूद करण्याची सोय आहे. तसेच हा मोबाईल नंबर लक्षात ठेवणेही कठीण जाणार आहे. याशिवाय, ज्यांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी संलग्न आहे, त्यांना नवा मोबाईल नंबर अस्तित्वात आल्यानंतर अडचणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
1 ऑक्टोबरपासून मोबाईल नंबर होणार 13 अंकी होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 1:18 PM