नवी दिल्ली : पुणे येथील एक स्टार्ट अप कंपनी चालू आर्थिक वर्षामध्ये ३,२०० मोबाईल पेट्रोल पंप बनवून त्यांची विक्री करणार आहे. या स्टार्टअपला ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांचे पाठबळ लाभले आहे.
रेपोज एर्जी ही पुणे येथील एक स्टार्टअप कंपनी असून, या कंपनीच्या संचालक मंडळावर रतन टाटा हे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. सदर कंपनी ही मोबाइल पेट्रोल पंप बनवित असून, सध्या अशी ३२० वाहने तयार असून यापैकी १०० वाहने कार्यरत असल्याचे कंपनीचे सहसंस्थापक चेतन वाळुंज आणि आदिती भोसले-वाळुंज यांनी सांगितले.
देशाला १ लाख पेट्रोल पंपांची गरज आहे, मात्र जागा आणि रकमेचा विचार करता ते शक्य नाही. सध्या ५५ हजार पेट्रोल पंप कार्यरत आहेत. उर्वरित गरज मोबाइल पंपाद्वारे भागविता येईल, असे मत वाळुंज यांनी व्यक्त केले आहे. मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून ग्राहकांना इंधन उपलब्ध करून दिले जाते. या वाहनाला एटीजी हे अद्ययावत सेन्सर बसविलेले असतात. त्यामुळे इंधनाची योग्य ती प्रत आणि प्रमाण कायम राहते. या वाहनावर असलेली जीपीएस यंत्रणा आणि जिओ फेन्सिंग यामुळे त्याचे स्थान आणि इतर माहिती मिळत असते. या मोबाईल पेट्रोल पंपांमुळे देशभरामध्ये असलेली पेट्रोल पंपांची गरज काही प्रमाणात पूर्ण होण्याची अपेक्षाही व्यक्त होत आहे.