जुलैच्या सुरुवातीला रिलायन्स जिओ, एअरटेल आणि नंतर व्होडाफोन-आयडियाने मोबाईल रिचार्जच्या किंमती अव्वाचे सव्वा करून ठेवल्या. यामुळे आधीच महागाईत पिचलेल्या लोकांचा तिळपापड झाला आणि अनेकांनी तुलनेने खूपच स्वस्त असलेल्या बीएसएनएलकडे धाव घेतली. तर बहुतांश लोकांनी महागडी रिचार्ज मारण्यास सुरुवात केली आहे. या मुद्द्यावर संसदेत सरकारला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर टेलिकॉम मिनिस्टर ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
शिंदेंचे स्पष्टीकरण ऐकून नेटकरी चांगलेच वैतागलेले दिसले. आधीच महागड्या रिचार्जमुळे त्रस्त असलेले लोक शिंदेंचे महागलेल्या रिचार्जवरील युक्तीवाद ऐकून आणखी त्रस्त झाले आहेत. भारत अशा देशांच्या यादीत आहे जिथे जगभराच्या तुलनेत आजही मोबाईल कॉल आणि इंटरनेट सर्वात स्वस्त आहे, असे शिंदे यांनी संसदेत सांगितले.
भारतातील मोबाईल कॉल रेट जगापेक्षा सर्वात कमी आहे. भारतात ५३ पैसे प्रति मिनिट असा कॉल रेट आहे. यातही सध्या तीन पैशांची कपात करण्यात आली आहे. याप्रकारे कॉल रेटमध्ये ९३ टक्क्यांची घसरण झालेली आहे. म्हणजेच कॉलिंग करणे स्वस्त झाले आहे. तसेच भारतात १ जीबी इंटरनेटचा दरही सर्वात कमी आहे. रिपोर्टनुसार १ जीबीसाठी ९.१२ रुपये लागतात, असे सरकारचे म्हणणे आहे. या माहितीनंतर नेटकरी संतापले आहेत व वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
भारतात ११७ कोटी मोबाईल युजर्स आहेत. तर ९३ कोटी लोक इंटरनेट वापरतात. २०२२ नुसार भारतात एकूण १४१.७२ कोटी युजर्स आहेत. म्हणजेच देशातील अधिकतर लोकसंख्येकडे मोबाईल आहे. मार्च २०२४ च्या आकडेवारीनुसार भारतात 954.4 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत.
देशातील 6,44,131 गावांमध्ये 298 दशलक्ष युजर्स आहेत. यापैकी 6,12,952 गावांमध्ये 3G आणि 4G कनेक्टिविटी आहे. म्हणजेच ९५.५ टक्के गावांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. मार्च २०१४ मध्येच देशातील एकूण इंटरनेट वापरकर्ते 251.5 दशलक्ष झाले होते.