भुवनेश्वर : दारू आणि मोबाइल विकत घेण्यासाठी एका पित्याने आपल्या ११ महिन्यांच्या मुलाला २५ हजार रुपयांत विकल्याचाप्रकार ओडिशामध्ये उघडकीस आला आहे. पोलिसांनी त्या पित्याला अटक केली आहे.ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील ही घटना आहे. बलराम मुखी असे आरोपीचे नाव असून, त्याने स्वत:च्या ११ महिन्यांच्या मुलाला केवळ दारू आणि मोबाइल फोनसाठी २५ हजार रुपयांना विकले. मिळालेल्या या रकमेतून त्याने दोन हजार रुपयांचा मोबाइल विकत घेतला आणि दीड हजार रुपये खर्च करून, आपल्या मुलीसाठी पैंजण खरेदी केले. त्यानंतर उरलेली सर्व रक्कम त्याने दारू पिण्यासाठी खर्च केली.पोलिसांनी आरोपी मुखीची पत्नी सुकुती हिची या प्रकरणी चौकशी केली असता, दाम्पत्याला आणखी एक मुलगा असल्याचे आढळून आले. भद्रक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुप साहू यांनी सांगितले की, बलराम मुखी हा सफाई कर्मचारी असून, त्याच्याकडे नियमित उत्पन्नाचे असे कोणतेही साधन नव्हते.या व्यवहारामध्ये त्याचा मेहुणा बलिया, तसेच एक अंगणवाडी कार्यकर्त्याचाही समावेश आहे. मुखीने आपल्या मुलालासोमनाथ सेठी नावाच्या व्यक्तीला विकले. (वृत्तसंस्था)विकत घेणा-याचीही चौकशीपोलीस निरीक्षक मनोज राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ सेठी यांच्या २४ वर्षीय मुलाचा पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता.मुलाच्या मृत्यूमुळे सोमनाथ यांच्या पत्नीला नैराश्य (डीप्रेशन)आले होते.मुलगा गमावल्याच्या धक्क्यातून पत्नीने बाहेर यावे, यासाठी सोमनाथ यांनी मुखीकडून त्याच्या ११ महिन्यांच्या बाळाला विकत घेतले होते. सोमनाथ सेठी यांचीही पोलीस चौकशी करीत आहेत.
मोबाइल, दारूपायी एक वर्षाच्या मुलाला विकले, ओडिशातील प्रकार, पोलिसांनी केली पित्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 1:29 AM