नवी दिल्ली: केदारनाथ मंदिरात मोबाईल फोन घेऊन जाण्यास, फोटो काढण्यास आणि व्हिडिओ बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदिराच्या व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने यासंदर्भातील फलक मंदिर परिसरात ठिकठिकाणी लावले आहेत. मंदिर परिसरात मोबाईल फोन घेऊन प्रवेश करू नका, मंदिराच्या आवारात कोणत्याही प्रकारचे फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी करण्यास पूर्णपणे मनाई असून तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आहात, असे या फलकांमध्ये सांगण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियामुळे केदारनाथ लोकांच्या मनांत भिनलं आहे. प्रत्येकाला आयुष्यात किमान एकदा केदारनाथला जाण्याची इच्छा नक्कीच असते. मात्र सध्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा सुळसुळाट झालाय. इन्फ्लुएन्सर्ससाठी केदारनाथ व्ह्युज आणि लाईक्स मिळवण्याचं एक माध्यम बनलं आहे. आता तर देवस्थानांवरही फोटो, व्हिडिओ, रील्स शूट करण्याचं प्रमाण वाढलंय. धार्मिक स्थळांचं तरी पावित्र्य राखा असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. त्यामुळे केदारनाथ मंदिर समितीने मंदीर परिसरात मोबाईल नेण्यास बंदी घातली आहे.
धार्मिक भावनांच्या विरोधात श्री केदारनाथ मंदिर परिसरात युट्युब शॉट्स, व्हिडीओ आणि इंस्टाग्राम रील्स बनवत आहेत. यामुळे यात्रेकरुंसह देश-विदेशात राहणाऱ्या हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. यासंदर्भात भाविकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. श्री केदारनाथ मंदिर परिसरात धार्मिक भावनांच्या विरोधात युट्युब शॉर्टस, व्हिडीओ किंवा इन्स्टाग्राम रील्स बनवणाऱ्यांवर कडक नजर ठेवून आवश्यक कारवाई करण्यात येईल. ज्यामुळे भविष्यात असे प्रकार घडू नयेत, याची काळजी घेण्यात येईल, असं मंदिर समितीने म्हटलं आहे.
जोडप्याचा व्हिडिओ झाला व्हायरल-
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक तरुणी केदारनाथ मंदिरासमोर बॉयफ्रेंडला प्रपोज करताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यावर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या. या व्हिडीओमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मंदिरासमोर प्रपोज केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केदारनाथ मंदिर समिती अॅक्शन मोडमध्ये आली आहे.