नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : मुंबईत वीजपुरवठा खंडित झाला, त्यामागे सायबर हल्ल्याची शक्यता नाकारण्यात आली. परंतु, आता सीमेपलीकडून नव्या स्वरुपात सायबर हल्ल्याच्या सूचनेमुळे गुप्तचर संस्थांत खळबळ निर्माण झाली आहे.
गुप्तचर सूत्रांनुसार चीन आणि पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा हॅकर्सच्या मदतीने सरकारमधील प्रमुख व्यक्तींचे फोन हॅक करण्याच्या प्रयत्नांत आहेत. सायबर सुरक्षेशी संबंधित यंत्रणांना सावध राहण्याचा आदेश दिला गेला. तसेच विशिष्ट व्यक्तींनाही सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी याआधी सरकारी किंवा खासगी संस्थांची व्यवस्था हॅकर्स लक्ष्य करायचे. आता प्रथमच देशात महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींच्या मोबाइल फोनद्वारे माहिती मिळत आहे. सूत्रांनुसार हे हॅकिंग व्हाॅट्सॲपद्वारे करण्याची योजना आहे. हॅकर्सनी यावेळी यासाठी विशेष प्रकारचा कोड तयार केला आहे. त्यावरून व्हिडिओ फाइलच्या माध्यमातून फोनमध्ये प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे हॅकर्स मोबाइल फोनचे महत्त्वाचे नियंत्रण मिळवू शकतात. त्यानंतर अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या कार्यक्रमापासून त्याचे ठिकाण, महत्त्वाचा दस्तावेज एवढेच काय फोनचा कॅमेरा आणि माइक हॅक करून विशेष प्रसंगांचा, व्हिडिओ, ऑडियो मिळवला जाऊ शकतो.
आयएसआयकडून पैसागुप्तचर संस्थांना हॅकर्सच्या अनेक ग्रुप्सला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून निधी मिळत असल्याची माहिती मिळाली आहे. या हॅकर्सना अनेक प्रकारच्या सुविधाही दिल्या जात आहेत. त्यात चीनच्या संस्थाही सहभागी आहेत.
या हल्ल्यांतून सुरक्षित राहण्यासाठी मोबाइल सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीमला अपडेट ठेवणे, मोबाइलमध्ये अँटिव्हायरस असणे, पासवर्ड ठरावीक अंतरांनी बदलण्याचाही सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. अनोळखी व विदेशी क्रमांकावरून येणाऱ्या व्हाॅट्सॲप कॉलकडे दुर्लक्ष करावे. व्हिडिओ डाऊनलोड करू नये व कोणत्याही लिंकवर क्लिक करताना सावधगिरी बाळगावी.