नवी दिल्ली : मोचा चक्रीवादळाची तीव्रता सारखी वाढत आहे. वादळ गुरुवारी संध्याकाळी ५:३० नंतर अधिक तीव्र झाले असून, गुरुवारी रात्री उशिरा त्याचे केंद्र बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी पोर्ट ब्लेअरच्या पश्चिम-वायव्येस ५१० किमी अंतरावर होते, असे भारतीय हवामान केंद्राने (आयएमडी) सांगितले.
दरम्यान, चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी बांगला देश आणि म्यानमारने तयारी केली असून, किनारपट्टी भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मोचा चक्रीवादळामुळे बुधवारी पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक झाडे उन्मळून पडली. मच्छिमारांनी रविवारपर्यंत बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला दिला देण्यात आला आहे. ‘मोचा’मुळे शनिवारी त्रिपुरा आणि मिझोराममध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
रविवारी भयंकर वेग; १७५ किमी प्रतितास
हवामान खात्यानुसार रविवारी वादळ उत्तर-ईशान्येकडे वळेल. हे वादळ बांगलादेशातील कॉक्स बाजार आणि म्यानमारच्या सिटवे शहरांदरम्यान धडकण्याची शक्यता आहे. यादरम्यान १७५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, असा अंदाज आहे.
ढाका : बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ या शक्तिशाली चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश आणि म्यानमारमधील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी किनारपट्टी भागातील हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आणि किनारी भागांपासून दूर राहण्याचा इशारा दिला.