नवी दिल्ली : देशभरातील मोकाट कुत्र्यांना नष्ट करण्याच्या युक्तिवादावर, या कुत्र्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, अशी टिपणी सर्वोच्च न्यायालयाने केली.न्या. दीपक मिश्रा व न्या. आर. भानुमती यांच्या पीठाने म्हटले आहे की, मोकाट कुत्र्यांना मारण्याची परवानगी जरूर आहे; परंतु ते करीत असताना योग्य संतुलन राखणे व त्यासाठी योग्य पद्धत अवलंबण्याची गरज आहे. एका याचिकाकर्त्याने मोकाट कुत्र्यांचा पूर्णपणे सफाया करण्यात यावा, अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने म्हटले आहे की, अशा कुत्र्यांना संपवले जाऊ शकत नाही. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांनी न्यायालयाच्या टिपणीशी सहमती व्यक्त केली.केरळ व मुंबईमध्ये विविध स्थानिक स्वराज्य संस्थांना मोकाट कुत्रे मारण्याची परवानगी देण्यासंबंधी दाखल याचिकांवर सुनावणी सुरू होती. यावर न्यायालयाने म्हटले की, हा मानवीय चिंतेचा विषय जरूर आहे; परंतु यासाठी कुत्र्यांना मारले जाऊ शकत नाही. कुत्र्याच्या चावण्याने एका व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. हा अपघात आहे; परंतु यासाठी आपण सर्वच मोकाट कुत्र्यांना मारू शकत नाहीत.केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे कुत्र्याने चावल्याची ४०० प्रकरणे आली आहेत. त्यापैकी २४ चा निपटारा करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी एक मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली. >केरळमध्ये प्रश्न गंभीरकेरळमध्ये मोकाट कुत्र्यांच्या चावण्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे व याचमुळे बालके शाळेतही जाऊ शकत नाहीत, असे एका वकिलाने सांगितले असता एखादे मैदान किंवा शाळेत काही मोकाट कुत्रे फिरत असल्यामुळे त्यांना मारले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
मोकाट कुत्र्यांनाही जगण्याचा अधिकार
By admin | Published: January 19, 2017 5:00 AM