उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील महाकुंभमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आलेली अँकर आणि मॉडेल हर्षा रिछारिया रविवारी होळी साजरी करण्यासाठी संभळ येथे पोहोचली. हर्षाने प्राचीन ग्रंथांमध्येही या शहराचा उल्लेख आहे. त्यामुळे याचा प्रचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. तसेच ती संन्यासी किंवा साध्वी नाही हे देखील स्पष्ट केलं आहे.
हर्षा रिछारियाने हिंदूंबाबत एक मोठं विधान केलं आहे. "मला वाटलं की, मला संभळला जायला हवं आणि शहरातील सनातनी बंधू आणि भगिनींना भेटायला हवं. वेद, पुराण आणि शास्त्रांमध्ये संभळबद्दल लिहिलं आहे की, कलियुगाच्या शेवटी भगवान कल्की पवित्र नगरी संभळमध्ये अवतार घेतील. अशा नगरीला जाणून घेणं प्रत्येक सनातनीचं कर्तव्य आहे. मी एक हिंदू व्यक्ती आहे" असं म्हटलं आहे.
"हिंदूंविरुद्ध दंगली होत आहेत. त्यांना जिवंत जाळलं जात आहे, त्यांना ट्रेनमध्ये जाळलं जात आहे. कोणताही पक्ष याबद्दल बोलत नाही. आज फक्त एकच पक्ष आहे जो हिंदूंबद्दल बोलतो आणि सर्वजण विरोधी पक्षांशी हातमिळवणी करतात"असं म्हणत हर्षाने राजकीय पक्षांवर आरोप केला आहे. तसेच तिने राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाचा उल्लेख केला.
जानेवारीमध्ये प्रयागराज कुंभमेळ्यादरम्यान संतांसोबत रथावर बसलेले हर्षा रिछारियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला. काही संतांनी त्यांच्या वर्तनावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर तिच्यावर कुंभमेळा सोडण्याची वेळ आली. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अँकर आणि मॉडेल असलेली हर्षा एक युट्यूबर आहे. ती भोपाळची रहिवासी आहे. तिचे इन्स्टाग्रामवर सुमारे १.८ मिलियन फॉलोअर्स आहेत.